पोलिओ लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कृती समितीला सूचना

0 झुंजार झेप न्युज

•पाच वर्षाच्या आतील दोन लाख एकावन्न हजार बालकांचे पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट

•जिल्ह्यात 2381 ग्रामीण व 319 शहरी असे एकूण 2700 बुथवरून पोलिओ डोज देण्यात

यवतमाळ,दि.7: येत्या 23 जानेवारी रोजी पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. याप्रसंगी शहरी व ग्रामीण भागासोबतच विटभट्ट्या, उसतोड कामगार वसाहत, मेंढपाळ, पोड, पाडे, तांडे व शहरी झोपडपट्याटभ इत्यादी दुर्गम भागात देखील पोलिओ लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून काळजीपुर्वक सर्वांचे लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. 

राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी एस.चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे, मुख्याधिकारी माधुरी मडावी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की पोलीओ लस देण्यासाठी संबंधीत आरोग्य पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण पुर्ण करून घ्यावे तसेच पोलिओ लसीकरण प्रसंगी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी हॅण्डग्लोज व मास्क वापरणे तसेच कोविड त्रिसुत्रीचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहील. पोलीओ मोहिमेत सामील पात्र आरोग्य सेवकांनी येत्या 10 जानेवारीपासून कोरोना बुस्टर डोज घ्यावा व पोलीओ मोहिमेसाठी गृहभेटी देतांना कोविड लस घेण्याबाबत जनजागृती करावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. लहान मुलांच्या इतर लसिकरणासाठी नागरिक जसे स्वत:हून पुढे येतात त्याचप्रमाणे 18 वर्षावरील मुलांच्या कोरोना लसिकरणासाठीही त्यांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी नागरिकांना केले.

पल्स पोलिओ लसीकरणाचे दिवशी जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख यांना तालुकानिहाय बुथवर भेटी देवून पर्यवेक्षणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले. 

जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी पल्स पोलिओ लसिकरणासाठीचे नियोजन सादर केले. जिल्ह्यात 2381 ग्रामीण व 319 शहरी असे एकूण 2700 बुथवरून पोलिओ डोज देण्यात येणार आहे. यासाठी एएनएम, एमपीडब्ल्यु, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर इत्यादी 6644 मनुष्यबळाची सेवा घेण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन, बस स्टॉप व चेकपोस्ट इत्यादी ठिकाणी 167 ट्रांझिट टिमद्वारे तर विविध जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रात 124 मोबाईल टिम द्वारे पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. पोलिओ लसिकरणासाठी 0 ते 5 वर्ष वयोगटातील 2 लाख 51 हजार 504 अपेक्षित लाभार्थींचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

 बैठकीला वैद्यकीय अधिकारी रमा बाजोरिया, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण अधिकारी प्रशांत थोरात, सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी डॉ. वृषाली माने, माणिक मेहरे, दिनेश राजा, प्रशांत पाटील व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.