•नियमांच्या अंमलबजावणीसाठी पथके
वर्धा,दि.10: गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोनाच्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागासह सर्व सबंधित यंत्रणा कामाला लागल्या असून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, सेवाग्रामचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, जिल्हा प्रशासन अधिकारी मनोजकुमार शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब, शिक्षणाधिकारी माधुरी सावरकर, लिंबाजी सोनवने आदी उपस्थित होते. तर जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच विभागीय व तालुका स्तरीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
काही दिवसानंतर रुग्ण वाढल्यास प्रशासनाची तयारी असणे आवश्यक आहे. जिल्हयात यावेळी प्राथमिक आरोग्य स्तरावर देखील कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून जिल्हा व तालुका स्तरावर सर्व केंद्र तयार करण्यात आले आहे. ऑक्सिजन, बेड, औषधे आदींची तयारी करण्यात आली असून या सर्व बाबींच्या व्यवस्थापनासाठी नोडल अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
शासनाने कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळया प्रकारचे निर्बंध जाहिर केले आहे. असले तरी अनेकदा नियमांचे उल्लघन होत असल्याचे दिसून येते. याकरीता दंडात्मक कारवाईसाठी काही विभागांना प्राधिकृत करण्यात आले असून तालुका स्तरावर देखेील पथके गठीत करण्याचे निदेर्श जिल्हाधिका-यांनी दिले आहे. या पथकामध्ये महसूल, स्थानिक प्रशासन, पोलिस आदिचा समावेश असून ही पथके गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच विना मास्क फिरणा-यांवर कारवाई करणार आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व अधिका-यांना मुख्यालयातच राहणे आवश्यक असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून तसे आदेशही निर्गमित करण्यात आले आहे. शासकीय नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी पोलिसांची विशेष पथके सुध्दा तयार करण्यात आली असून गर्दी करणा-यांवर तसेच नियमाचे उल्लंघन करणा-यावर या पथकाव्दारे कारवाई करण्यात येणार आहे.
