फेरफार जलदगतीने निकाली काढणार अदालतीसाठी पर्यवेक्षक अधिकारी नियुक्त
वर्धा,दि.9: महाराजस्व अभियांनातर्गत जिल्हयातील सर्व आठही तालुक्यात आज एकाच दिवशी ई-फेरफार अदालतींचे आयोजन करण्यात आले होते. प्रलंबित व नव्याने अर्ज केलेल्या नागरिकांना तातडीने फेरफार उपलब्ध करुन देण्यासाठी एकाच दिवशी मोठया प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात आला. सेलू तहसिल कार्यालयात आयेाजित या फेरफार अदालतीत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वत: सहभाग घेऊन कामकाजाची पाहणी केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती. नागरिकांच्या मालमत्तेचे वेळीच फेरफार होणे आवश्यक असते. ही कारवाई वेळीच न झाल्यास पुढे विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे राज्य शासनाने सुरु केलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत फेरफारचे काम अधिक गतिमान होण्यासोबतच नागरिकांची महसूल प्रशासनाशी संबधित इतर कामे कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी ई-फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती.
सर्व तहसिल कार्यालयात आज ही फेरफार अदालत पार पडली. नागरिकांचे प्रलंबित फेरफारासह यासाठी नव्याने आलेले अर्ज व तक्रारींचे निराकरण सर्व तालुक्याच्या ठिकाणी आज निकाली काढण्यात आले. ही अदालत चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली होती. वर्धा तालुक्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, सेलू तालुका उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, देवळी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यंवशी, आर्वी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, आष्टी जिल्हा पुर्नवसन अधिकारी रविंद्र जोगी, कारंजा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, हिंगणघाट उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले तर समुद्रपूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांची पर्यवेक्षक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सेलू तहसिल कार्यालयात आयोजित फेरफार अदालतीत प्रत्यक्ष सहभाग घेतला. तेथे फेरफारसाठी आलेल्या नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांचेशी त्यांनी संवाद साधला. या अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांची फेरफार प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना दिले.
