जिल्हा नियोजन समिती निधीतील जि. प. कडील विकासकामांचा आढावा

0 झुंजार झेप न्युज

निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश आजच काढा प्रशासनाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे सुस्पष्ट आदेश

अमरावती, दि.25: ग्रामीण भागात विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही अजूनही अनेक कामांना सुरुवातच झाली नाही. हे अत्यंत गंभीर असून, याबाबत कुठलीही हलगर्जी खपवून घेणार नाही. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश आजच काढावे व उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. आपण स्वतः दोन दिवसांनी पुन्हा आढावा घेऊ, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्हा परिषदेतील जिल्हा नियोजन समितीविषयक कामकाजासंबंधी बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर,पूजा आमले, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी सभापती जयंतराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातील विविध कामासाठी जि. प. ला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. तथापि, प्रशासनाकडून अनेक कामांना सुरुवात झाल्याचे दिसत नाही. असा हलगर्जीपणा खपवुन घेणार नाही. निविदा प्रक्रिया झालेल्या कामांचे आदेश आजच काढा. उर्वरित निविदा प्रक्रिया पूर्ण करा.या कामांचा पुन्हा दोन दिवसांनी आढावा घेण्यात येईल. सर्व कामांच्या प्रगतीबाबत बुकलेट सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

तीर्थक्षेत्र विकास योजनेत अनेक कामे प्रलंबित आहेत. अनेक कामाच्या दीड वर्षांपासून प्रशासकीय मान्यता मिळूनही कामे सुरू झाली नाहीत. तीर्थक्षेत्र, जनसुविधा, १५ वा वित्त आयोग, अंगणवाडी, वर्गखोली, दवाखाना बांधकाम आदी अनेक नियोजित कामांना चालना द्यावी. कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावीत. जि. प. प्रशासनाने कामांचा नियमित आढावा घ्यावा.प्रत्येक अंगणवाडीत बोलकी अंगणवाडी उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.