संपूर्ण देशभरातील ब्रॉडगेज रेल्वे विद्युतीकरणाची कामे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

0 झुंजार झेप न्युज

•देशभरात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार

•मनमाड ते मुदखेड पर्यंत रेल्वे विद्युतीकरण कामाचा शुभारंभ

जालना,दि.12: अखंड रेल्वे कनेक्टिव्हिटी सक्षम करण्याबरोबरच रेल्वेचा सरासरी वेग सुधारण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे विद्युतीकरणाचे संपूर्ण देशभरातील काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.मनमाड ते मुदखेड या 357 कि. मी. अंतराच्या रेल्वे मार्गाचे 484 कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या रेल्वे विद्युतीकरण कामाचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते जालना येथे आज संपन्न झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, खासदार संजय जाधव, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड, माजी राज्यमंत्री अतुल सावे, भास्कर दानवे, उप महाव्यवस्थापक दक्षिण मध्ये रेल्वेचे अरूण जैन, विभागीय व्यवस्थापक,नांदेडचे उपेद्रसिंह आदींची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, रेल्वे विद्युतीकरणामुळे इंधनाच्या खर्चात मोठी घट होते, तसेच मार्गावरील वाहतूक खोळंबा कमी होऊन रेल्वेचा सरासरी वेग सुधारत असल्याने रेल्वे विद्युतीकरणावर भर देण्यात येत आहे. संपूर्ण देशभरातील ब्रॉडगेज मार्गावरील रेल्वे विद्युतीकरणाचे 73 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. दरवर्षी 1 हजार 440 किलोमीटरचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण केल्या जात असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात 6 हजार किलोमीटरच्या विद्युतीकरण कामासाठी 7 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशभरातील ब्रॉडगेज रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही श्री. दानवे यांनी सांगितले.

भविष्यात संपूर्ण देशभरात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचे सांगत मुंबई ते नागपूर दरम्यान बुलेट ट्रेनही सुरू करण्यात येणार आहे, यासाठीचा डीपीआर येत्या महिन्याभरात तयार होणार आहे. या ट्रेनचे काम पूर्ण झाल्यास केवळ दीड तासांमध्ये मुंबई ते औरंगाबाद अंतर पार करता येणार आहे. जालना-खामगाव मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी निधी मंजूर केला असून राज्यातील होणारे प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने पूर्णत्वास जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, ज्या देशात दळणवळणाची व्यवथा मजबूत असेल त्या देशाचा विकास झपाट्याने होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. याच बाबीचा विचार करून देशातील दळणवळण व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.

मराठवाड्यासाठी आजचा महत्वाचा क्षण आहे. रेल्वे विद्युतीकरणाची बऱ्याच दिवसांची मागणी होती, ती आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. विद्युतीकरणाबरोबरच दुहेरीकरणाचे कामही गतीने पूर्ण होईल. देशाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी प्रधानमंत्री गतीशक्ती योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विविधांगी विकास साधण्यात येणार आहे. मराठवाडयातील रेल्वेचे विविध मार्ग तयार होऊन संपूर्ण मराठवाड्यात रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे तसेच माल वाहतुकीसाठी रेल्वेचा विशेष कॉरिडॉर निर्माण व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

यावेळी खासदार संजय जाधव, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार प्रशांत बंब, माजी राज्यमंत्री अतुल सावे आदींचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.