वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करा
यवतमाळ,दि.23: पिण्यासाठी व आवश्यक कामासाठीचा पाण्याचा वापर वगळल्यास प्रत्येक कुटूंबामागे वर्षाला अंदाजे 5 लक्ष लिटर पाण्यापैकी 4 लक्ष लिटर पाणी वाहुन जाते. या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास किंवा ते जमिनीत मुरविल्या गेले तर भुगर्भ पाणीपातळी झपाट्याने खाली जाण्यास आळा बसून भविष्यातील पाणी संकट टळण्यास मदत होईल, असे मत सावित्री ज्योतीराव फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाशजी शिर्के यांनी व्यक्त केले.
22 मार्च या जागतिक जलदिनाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाने 16 ते 22 मार्च 2022 हा आठवडा जलजागृती सप्ताह म्हणून साजरा केला. या जलसप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे काल आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य अविनाशजी शिर्के, प्रमुख अतीथी म्हणुन जलतज्ञ डॉ. चेतनजी दरणे, सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता मनिष राजभोज, उपअधीक्षक अभियंता ग.ल. राठोड, कार्यकारी अभियंता घनश्याम तोटे, श्रीकांत मस्कावार, सचिन मुन्नोळी व श्री. बागुल हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्राचार्य शिर्के यांनी पुढे बोलतांना उत्कृष्ट तंत्रज्ञान व लोकसहभागातुन पाणलोट क्षेत्र विकास कामाचा तपशील सादर केला व पाणीबचतीसाठी लोकसहभागातुन लोकचळवळ उभी करावी असे आवाहन केले.
अधिक्षक अभियंता मनिष राजभोज यांनी दिवसेंदिवस वाढत चाललेली पाण्याची समस्या नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक नागरिक हा जलसाक्षर असलाच पाहिजे. सदर कार्यक्रम हा शासकीय उपक्रम न राहाता वर्षभर जलसंवर्धनाचा संदेश प्रत्येकाने घरोघरी पोहचविण्याची जबाबदारी पार पाडावी, असे मत व्यक्त केले.
कार्यकारी अभियंता घनश्याम तोटे, यांनी प्रत्येकाने जलदूत होऊन पाणी बचतीसाठी काम केले पाहिजे व आजच्या पीढीने पुढच्या पिढीसाठी पाण्यासारख्या नैसर्गिक संपत्तीचा वारसा जतन करुन ठेवला पाहिजे असे सांगितले. श्रीकांत मस्कावार यांनी प्रास्ताविकेतून जलजागृती सप्ताहात जलजागृतीसाठी आयोजीत केलेल्या उपक्रमांचा तपशिल सादर केला. तर कार्यकारी अभियंता श्री. बागुल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जलजागृती सप्ताहात राबविलेल्या कार्यक्रमाचे सादरीकरण करुन माहिती दिली.
जलदूत डॉ. चेतन दरणे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे याबद्दल विस्तृत माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन अभियंता अशोक ढवळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यकारी अभियंता सचिन मुन्नोळी, यांनी व्यक्त केले.
डेहणी येथे कार्यशाळेचे आयोजन
जलजागृती सप्ताह 2022 चे निमित्ताने जलसंपदा विभागाअंतर्गत बेंबळा प्रकल्पाचे डेहणी उपसा सिंचन उपविभाग डेहणी येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्र येथे दि.21 मार्च 2022 रोजी योजनेच्या लाभक्षेत्रातील पाणीवापर संस्था व लाभधारकांकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील पाणीटंचाई बघता पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने वापर करण्याचे दृष्टीने समाजामध्ये जागृती निर्माण करणे हा जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्याचा मुख्य उद्देश असल्याबाबत यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी सिंचनाकरीता पारंपारीक पट्टा पध्दतीचा वापर न करता कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेण्याकरीता तुषार सिंचन व ठिबक सिंचन पध्दतीचा जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज असल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले.

