प्रत्यक्ष सादरीकरणाचे महत्व अबाधित कलापथक, पथनाट्याला मोठा प्रतिसाद
अमरावती,दि.30: माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात करमणूक, संदेशवहन, जनजागृती आदींसाठी अनेक नवनवी माध्यमे उपलब्ध असतानाही प्रेक्षकांपुढे प्रत्यक्ष सादरीकरण होणा-या माध्यमांचेही महत्वही तेवढेच अबाधित आहे. त्याची प्रचिती जिल्ह्यात जनजागृतीसाठी गावोगाव आयोजित कलापथकांच्या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादावरून आली.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती अमरावती जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात लोककलापथकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोहिम जिल्ह्यात सर्वदूर राबविण्यात आली. स्थानिक वऱ्हाडी भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, भारुड आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून आणि विशेषत: मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात कोरकू भाषेतूनही शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात आली.
यात लोककलावंतांनी केलेल्या प्रत्यक्ष सादरीकरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष सादरीकरणाची कलेची जिवंत अनुभूती देण्याची ताकद असते. त्यामुळे या माध्यमाचे महत्व अबाधित असल्याची प्रचीती यानिमित्ताने आली. खेडोपाडी सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या कार्यक्रमाला आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. ज्येष्ठ नागरिक, महिलांसोबत तरूण वर्गानेही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मनोरंजनात्मक पध्दतीने प्रबोधन केल्यामुळे गावकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. या कार्यक्रमांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अमरावती, भातकुली, चांदुरबाजार, अचलपूर, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा तसेच धारणी तालुक्यात एकूण 63 हून अधिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

