▪️ मातोश्री पाणंद रस्ते तसेच रोजगार हमी योजनेची विभागीय आढावा बैठक
प्रत्येक पंचायत समितीला मातोश्री भवन बांधणार
उद्दिष्टापेक्षा जास्त मनुष्यदिवस निर्मितीसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार
यवतमाळ,दि.26: शेतमाल बाजारात पोहविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामाला गती देऊन मंजूर पाणंद रस्ते 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना तसेच फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी आज अमरावती येथे दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त पियुष सिंह, नरेगा आयुक्त शांतनु गोयल, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन देणे व ज्या गावात रोहयोंच्या कामांवर मजूरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यक काम हाती घेण्यात यावे, जेणेकरुन मजूरांना रोजगार मिळेल व रोजगारामुळे मजूरांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचे मंत्री भूमरे यावेळी म्हणाले.
संपूर्ण राज्यात प्रत्येक पंचायत समितीत रोजगार सेवकाला कामकाजासाठी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मातोश्री भवन स्थापन करण्यात येईल. राज्यात एक लाखांवर रस्त्यांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्यावर भर द्या. याशिवाय शाळेची कुंपण भिंत, स्मशानभूमी अशा कामांसाठीही रोहयोच्या मजूरांची मदत घ्या. मातोश्री पाणंद रस्ते हा केवळ शेतकऱ्यांसाठी नसून संपूर्ण गावकऱ्यांना याचा फायदा होतो. यासाठी पाणंद रस्त्याची कामे गुणवत्तापूर्वक करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अमरावती विभागातील रोहयो विभागाची जिल्हानिहाय स्थिती यावेळी जाणून घेण्यात आली. रोजगार हमी योजनेची सुरुवातच महाराष्ट्रातून झाली आहे. यामुळे रोहयोच्या कामांमध्ये महाराष्ट्र अव्वल व्हावा. रोजगार हमी योजनेंतर्गत मजूराने कामाची मागणी केल्यास त्याला 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करुन द्यावे. मजूरांसाठी पुरेसे जॉबकार्ड तयार होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांनी सातत्त्यपूर्ण प्रयत्न करावे. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी क्षेत्रनिहाय भेटी द्याव्यात. कामाचे अंदाजपत्रक लवकारात लवकर तयार व्हावे, यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर करा. तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता त्वरित मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे अपर मुख्य सचिव श्री. नंद कुमार यांनी यावेळी सांगितले.
“यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी नरेगा अंतर्गत फळबाग लागवड वाढविण्याचे नियोजन असून 2500 हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. सध्या 1350 हेक्टरवर 1202 कामे सुरु आहेत. शिवाय जिल्ह्यात रेशीम लागवड वाढविण्यात येत असून 500 हेक्टरचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या 34.80 हेक्टर वर 87 कामे सुरू आहे.सन 2021- 22 मध्ये यवतमाळ जिल्ह्याने 1 लक्ष 50 हजार मजुरांना काम उपलब्ध करून दिले आहे. तर 2022-23 मध्ये 25 एप्रिलपर्यंत 40 हजार 916 मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले.
ग्रामीण भागात नरेंगा अंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याला 26 लाख 94 हजार 816 मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट असतांना जिल्ह्याने 34 लाख 11 हजार 560 मनुष्यदिवस निर्मिती केली. ती लक्ष्यांकाच्या 124 टक्के आहे. या उत्तम कामासाठी आज अमरावती येथे झालेल्या बैठकीत रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा सत्कार केला.”बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

