मोठी बातमी: भाजपाचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
पिंपरी चिंचवड,दि.3 : विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. लक्ष्मण जगताप हे लढवय्ये नेते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराने गाठलं होत. त्यातून ते सुखरूप सुटतील अस वाटत असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांच उपचारादरम्यान निधन झालं.
पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करण्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली होती. मनपाचे महापौरपदही त्यांनी भूषविले होते. तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
व्हिलचेअर बसून विधीमंडळात केले होते मतदान
जून २०२२ रोजी मुंबई येथे राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुण्याहून रुग्णवाहिकीने आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक आल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्र भाजपाने या दोघांच्याही त्याग आणि समर्पण वृत्तीचे कौतुक केले होते. काही दिवसांपुर्वीच मुक्ता टिळक यांचेही निधन झालेले आहे. त्यानंतर महाराष्ट्र भाजपाला हा दुसरा धक्का बसला आहे.
लक्ष्मण जगताप यांचा राजकीय प्रवास
१९८६ साली पहिल्यांदा नगरसेवक
२००२ पर्यंत नगरसेवक, दरम्यान महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष
२००४ पासून आमदार
२०१४ साली भाजपामध्ये प्रवेश
२०१४ आणि २०१९ असे दोनवेळा भाजपाचे आमदार
२०१७ साली महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापन करण्यात मोलाचा वाटा

