शहिदांच्या सन्मानार्थ शहरात शिलाफलकांची उभारणी
पिंपरी चिंचवड,दि.18: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने ‘’माझी माती माझा देश’’ हे अभियान संपूर्ण देशात राबविण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिका देखील आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबवित असून माझी माती माझा देश अभियानातंर्गत महापालिकेच्या वतीने शहरात शहिद जवानांच्या सन्मानार्थ शिलाफलकांची उभारणी करून वीरांना अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या अग्निशमन विभागातील शहिद अग्निशामक विमोचक विशाल जाधव यांच्या नावाचा शिलाफलक वल्लभनगर येथे उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. अनावरण प्रसंगी शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता रामदास तांबे, उप आयुक्त रविकिरण घोडके, उप अभियंता जयकुमार गुजर, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच अग्निशमन विभागातील जवान व कर्मचारी उपस्थित होते.
१ डिसेंबर २०१९ रोजी विशाल जाधव कर्तव्य बजावत असताना शहीद झाले होते. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचे शहरवासीयांना स्मरण व्हावे यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणाची निवड करून संत तुकाराम नगर येथे त्यांचा शिलाफलक उभारण्यात आला आहे.
तर मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथेही महापालिकेच्या वतीने भारत-चीन, भारत-पाक युद्धात तसेच लष्करी कारवायांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावांचा शिलाफलक उभारण्यात आला आहे. त्याचेही अनावरण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शशिकांत पाटील, सह शहर अभियंता रामदास तांबे, उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात आलेल्या शिलाफलकात आय. पी. एस अशोक कामटे, सॅपर जयसिंग शिंगटे, एम. ई. तुळशीराम साळुंखे, नाईक नागोजी मोरे, सुभेदार जालिंदर पाटील, मेजर प्रकाश पाटील, नाईक दत्तात्रय भोसले, फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या शहीद जवानांच्या नावांचा समावेश आहे.

