रुसलेल्या पावसाला मुस्लिम बांधवांचे साकडे.
विहामांडवा,दि.27: पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे सर्व पिके जोमात असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पाऊस पडावा यासाठी विहामांडवा येथील मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून प्रार्थना केली.रोजी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी सामूहिक नमाजपठण करुन प्रार्थना केली. दरम्यान सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत नागरिकांनीही यात सहभाग नोंदवला.विहामांडवा सह परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून तुरळक पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतातील सोयाबिन, कापूस, तूर, मका, पिकाने माना टाकल्या आहेत. एक-दोन दिवसात चांगला पाऊस आला नाही तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. रिमझिम पावसावर आतापर्यंत पिके तरली आहे. तीन महिन्यांत एकदाही दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरी तलावाची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली.आता पावसाने दडी मारली आहे. बहरलेला हंगाम धोक्यात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांनी माना टाकल्या. पिके वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पूर्वी कपाशीतून उत्पन्न मिळविणाऱ्यांना शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनकडे वळला. परंतु पावसाने दडी मारल्याने पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी ओलित करीत आहे. परंतु, विहामांडवा सह परिसरातील ८० टक्के शेतकऱ्यांकडे पुरेशी सिंचनाची सुविधा नाही. सर्व जण मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
येत्या तीन-चार दिवसात चांगला पाऊस न झाल्यास खरिपाची पिके हातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बाजारपेठेत देखील उलाढाल मंदावली. बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसासाठी देवाला साकडे घातले जात आहे. त्या अनुषंगाने आज विहामांडवा येथील ईदगाह मैदानामध्ये पावसासाठी विशेष नमाज अदा करण्यात आली व अल्हा कडे प्रार्थना करण्यात आली.

