जनता दरबारात 197 नागरिकांनी दाखल केले अर्ज यापुढे महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनादिवशीच जनता दरबाराचे होणार आयोजन - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर,दि.04: जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न तातडीने सोडविणारा जनता दरबार कोविड काळात थांबविण्यात आला होता. आता पुन्हा संधी मिळाली असल्याकारणाने तो दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न तातडीने सुटतील. आज दाखल झालेल्या 197 अर्जांवर तातडीने एका महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून जर अर्ज निकाली निघत नसेल तर त्याची कारणेही लेखी स्वरूपात संबंधित विभागाला द्यावी लागतील असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनता दरबारात दिले. या जनता दरबारावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, छत्रपती प्रमिलाताई राजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश गुरव तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी वर्ग उपस्थित होते.
कोविड नंतर झालेल्या पहिल्याच जनता दरबारामध्ये नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखविला. यावेळी नागरिकांनी आपली निवेदने, अडचणी, समस्या याबाबतचे अर्ज मंत्री व जिल्हा प्रशासनासमोर सादर केले. जनता दरबारात अर्जांवर चर्चा करून मंत्री महोदयांनी संबंधित विभागास ते अर्ज वर्ग करून तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक निर्देशही दिले. सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयामध्ये आपले काम घेऊन सतत हेलपाटे मारावे लागतात. त्यावर पर्याय म्हणून जनता दरबारामध्ये नागरिकांनी अर्ज दाखल केल्यास त्यांचा येण्या जाण्याचा त्रास वाचतो. जनता दरबार मध्ये सादर केलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्याचा कालावधी ठरलेला असून एक महिन्याच्या आत त्याच्यावरती निकाल देणे अपेक्षित आहे. यामुळे अर्ज वेळेत निकाली लागून सर्वसामान्य लोकांना समाधान मिळते असे मंत्री, हसन मुश्रीफ पुढे म्हणाले.

