भाऊबीज चे औचित्य साधून आम आदमीच्या "बसमित्र" संकल्पनेने बस चालकाकडून घेतली आठ वचने
पुणे,दि.16: आम आदमी पक्षाने सुरू केलेल्या बस मित्र या संकल्पनेला चार आठवड्यापूर्वी सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बस मित्र बनून शहरातील विविध बस थांब्यांवर वर थांबून नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची विचारपूस केली तसेचं बस चालकांना बस योग्य प्रकारे बस थांब्याजवळ थांबून नागरिकांना सहकार्य करण्याचे विनंती केली होती. या दोन्ही गोष्टींची पूर्तता होत असतानाच आता दुसऱ्या टप्प्यात आम आदमी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी भाऊबीजेचे औचित्य साधत आज सर्व बस चालक तसेच वाहक यांच्याकडून ओ़वाळणी च्या रुपाने आठ वचने घेतली. या आठही वचनांमुळे शहरातील नागरिकांना तसेच बस चालक आणि वाहक यांना देखील शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यात सहभागी करून घेता येईल आणि त्याचा परिणाम म्हणून काही प्रमाणात शहरातील वाहतूक कोंडी तसेच प्रदूषण कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष आणि बस मित्र संकल्पनेचे जनक चेंथिल अय्यर यांनी यावेळी बोलून दाखवले.
दिवसेंदिवस पुणे शहरातील हवेचे गुणवत्ता खालावत चालली असताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे येण्याची वेळ आली आहे असे मत यावेळी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी व्यक्त केले.
यावेळी आम आदमी पक्षातर्फे सुरेखा भोसले, माधुरी गायकवाड, शितल कांडेलकर, मुमताज शेख, ॲनी अनिश, सुनिता काळे, प्रिया जाधव, चेंथिल अय्यर, किरण कद्रे, ॲड. अमोल काळे, प्रशांत कांबळे, संजय कोणे,अविनाश भाकरे, अनिश वर्गीस, ऋषिकेश मारणे, अमोल मोरे या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

