कचऱ्याच्या बायोमायनिंगमुळे महापालिकेस उपलब्ध होणार २५ एकर जागा

0 झुंजार झेप न्युज

कचऱ्याच्या बायोमायनिंगमुळे महापालिकेस उपलब्ध होणार २५ एकर जागा

पिंपरी चिंचवड,दि.11 : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी कचरा डेपो येथील बायोमायनिंग प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. सॅनिटरी लँडफिल १ येथे ८ लाख चौरस मीटर जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगचे ७०% काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मोशी साईटवरील अतिरिक्त १५ लाख चौरस मीटर कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यावर महापालिका लक्ष केंद्रित करणार असून नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात दैनंदिन निर्माण होणारा कचरा पुर्वीपासुन मोशी येथील कचरा डेपोमध्ये प्रक्रिया करण्याकरिता पाठविण्यात येतो. बायोमायनिंग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मोशी कचरा डेपोमध्ये २५ एकर जमीन मोकळी होणार आहे. या जमिनीचा वापर भविष्यातील घनकचरा व्यवस्थापन उपक्रम आणि नागरी विकास प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात मोशी येथे सॅनिटरी लँडफिल १, २ व कँपिंग केलेल्या एकुण २५ एकर जागेत २३ लाख चौरस मीटर (८ लाख + १५ लाख) इतका जुना डंपींग केलेला कचरा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे शास्रोक्त पद्धतीने बायोमायनिंग करताना तयार होणारे आरडीएफ सिमेंट बांधकाम कंपन्यांना देण्यात येत असून जैव माती शेती आणि गार्डनिंगसाठी वापरण्यात येत आहे. उरलेला राडारोडा सखल भागात जमीन समपातळीत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

या प्रकल्पाबाबत बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, बायोमायनिंगद्वारे पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या दिशेने महापालिकेने महत्वपुर्ण पाऊल टाकले आहे. बायोमायनिंगचे कामपुर्ण झाल्यानंतर जुन्या ३० वर्षातील साठलेल्या कचऱ्याचे शास्रोक्त पद्धतीने विघटन होणार आहे. बायोमायनिंगचे दुसऱ्या टप्प्याचे काम पुर्ण झाल्यास २५ एकर जागा घन कचरा व्यवस्थापनाच्या इतर प्रकल्पांकरीता उपलब्ध होणार आहे.

सह शहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कचऱ्याचे आरडीएफ आणि जैव माती सारख्या मौल्यवान स्त्रोतांमध्ये रूपांतर करून महापालिका टिकाऊ पद्धतींना चालना देत आहे, ज्यामुळे पर्यावरणाला आणि फायदा होत आहे.

बायोमायनिंगचे फायदे :-

१. जुन्या टाकलेल्या कचऱ्याने व्यापलेल्या जमिनीचा पुर्नवापर करण्यास मदत मिळते. 

२. बायोमायनिंगद्वारे, कचऱ्यातून आरडीएफ आणि बायोसॉइल सारख्या मौल्यवान संसाधने काढली जातात ज्यांचा वापर जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी किंवा बागकामासाठी खत म्हणून केला जाऊ शकतो. 

३. बायोमायनिंगमधून निर्माण झालेले आरडीएफ अक्षय ऊर्जा स्त्रोत म्हणून काम करते. तसेच यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबत्व कमी होण्यास आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यासही मदत मिळते.

४. बायोमायनिंगमुळे उत्पादित होणारी जैव माती पोषक तत्वांनी समृद्ध असते. या जैव मातीच्या वापरामुळे मातीची सुपीकता तसेच शाश्वत शेती आणि लँडस्केपिंग पद्धतींना आधार मिळतो.

५. कचऱ्याने व्यापलेली जमीन मोकळी होऊन भविष्यातील विकास प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन उपक्रमांसाठी उपलब्ध होते. यामुळे कार्यक्षम जमीन वापर आणि शहरी नियोजनाला प्रोत्साहन मिळते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.