भोसरी विधानसभा मतदार संघात आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात येऊ नये : सचिन काळभोर

0 झुंजार झेप न्युज

⟩ भोसरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी न देणेबाबत.

पिंपरी चिंचवड,दि.27: भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे कायम दहशतीचे राजकारण करतात. त्यांना पक्षाने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. या पदाच्या माध्यमातून त्यांनी शहरात संघटना वाढविण्यासाठी कोणतेही कार्य केले नाही. उलट भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अनेक निष्ठावान नगरसेवक पक्षापासून लांब गेले आहेत. माजी महापौर नितीन काळजे हे सुद्धा आमदार महेश लांडगे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून ते दूर गेले आहेत. माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे पक्षाचे सर्वात जुने कार्यकर्ते होते. त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या हुकूमशाही कारभारामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे माजी नगरसेवक वसंत बोराटे, संजय नेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. हे सर्वजण आमदार महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळूनच भाजप सोडण्याचा निर्णय घेतला हे उघड आहे. सध्या पक्षात असलेले अनेक नगरसेवक आमदार महेश लांडगे यांना साथ देण्याच्या मनःस्थितीत नाहीत. 

आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून कधीच पक्षाला महत्त्व दिले नाही. त्यांनी पक्षापेक्षा स्वतःलाच मोठे समजले आहे. पक्षाला त्यांनी कायम दुय्यम स्थान दिले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची मोठी हानी झालेली आहे. आमदार महेश लांडगे हे पक्षाच्या शहराध्यक्षांना सुद्धा मानत नाहीत. भोसरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात मग ते पक्षाचे कार्यक्रम असले तरी आमदार महेश लांडगे यांनी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच संघटनेतील अन्य पदाधिकाऱ्यांचे कधीच फोटो वापरले नाहीत. आजही ते संघटनेशिवाय भोसरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्या आमदार महेश लांडगे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळणार नाही हे उघड आहे.

आमदार महेश लांडगे यांनी १० वर्षे या पदावर काम करीत असताना फक्त सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचे काम केले आहे. त्यांनी मतदारसंघातील कोणत्याही विकास प्रकल्पांना न्याय दिलेला नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघांतर्गत निगडी सेक्टर क्रमांक २२ येथे  जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या इमारती गेल्या १३ ते १४ वर्षापासून पडून आहेत. पात्र लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही. तसेच निगडी येथील पीसीएमसी कॉलनी येथील धोकादायक इमारतीमधील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले नाही. ७७४ कुटुंब त्या धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्य करत आहेत. त्याबाबतही आमदार महेश लांडगे यांनी काहीच पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण प्रभाग क्रमांक १३ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात असंतोष निर्माण झालेला आहे. निगडी येथील आण्णाभाऊ साठेनगर येथे बैठ्या चाळी असून गेल्या ४० वर्षांपासून येथील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यासंदर्भातही आमदार महेश लांडगे यांनी कधी पाठपुरावा केला नाही. रेडझोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात आले नसून त्यामुळे बांधकाम परवानगी देण्यात येत नाही. रुपीनगर, त्रिवेणीनगर, सेक्टर २२ निगडी, तळवडे याठिकाणी रेडझोनमुळे बँक लोन होत नाही. बांधकाम परवानगी देण्यात येत नाही. तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या मोजडीला तडे गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष बदनाम झाला आहे. हे फक्त आमदार महेश लांडगे यांच्यामुळे झाले. त्यांच्या वैय्यक्तिक हितामुळे पक्ष बदनाम झाला आहे.  

भोसरी विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या मुलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रासातून जावे लागत आहे. या नागरिकांमध्ये आमदार महेश लांडगे यांच्याविषयी संतापाची भावना आहे. आमदार महेश लांडगे हे केवळ सोशल मीडियावर इव्हेंट करणारे आहेत असा या नागरिकांचा समज झाला आहे. त्यामुळे हे नागरिक आमदार महेश लांडगे हे भाजपचे उमेदवार असतील तर ते पक्षाला कितपत मतदान करतील याबाबत शंका आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकाळात भोसरी विधानसभा मतदारसंघात दहशत आणि गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली. या दहशत आणि गुंडगिरीचा सामान्य नागरिकांसोबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केवळ सामान्य नागरिकच नाही तर प्रशासनात देखील आमदार महेश लांडगे यांच्याविषयी नकारात्मक भावना आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या संभाजी महाराज पुतळा प्रकरण आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच उद्भवले आहे. त्यांच्या हट्टापायीच या पुतळ्याची जागा बदलण्यात आली. त्यामुळे विरोधकांना संभाजी महाराज पुतळा प्रकरणातील भ्रष्टाचाराचा आयता मुद्दा सापडला. भोसरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवरून विरोधक भ्रष्टाचाराचे जे आरोप करीत आहेत, त्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. 

आमदार महेश लांडगे यांनी १० वर्षात कामांपेक्षा वैयक्तिक गवागवा जास्त केल्याने आता ते नागरिकांना नकारात्मक वाटू लागले आहे. या नकारात्मक वातावरणामुळे पक्षाने जर महेश लांडगे यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली, तर भोसरी मतदारसंघात भाजपचा पराभव होऊ शकतो. हक्काची एक जागा भाजपला गमवावी लागू शकते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी न देता दुसऱ्या एखाद्या चांगल्या व निष्ठावान तसेच पक्ष संघटनेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्याला भोसरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस नामदेव ढाके, संजय मगोडेकर, विलास मडेगिरी, महेश कुलकर्णी, बाळासाहेब मोळक, शेखर लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, भगवान मनसुख यांच्यासोबत पक्षाच्या राज्यातील नेते मंडळींनी संयुक्त बैठक घेऊन भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी न देण्याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.