भोसरी येथील श्रीगणेश विसर्जन मिरवणूकीस दुपारी ४.३० वाजता झाली सुरुवात.
पिंपरी चिंचवड,दि.17: पारंपरिक ढोल ताशांचा गजर, डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक रथ सजावट अशा विविध स्वरूपात भक्तीमय वातावरणात भोसरी येथे "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणांच्या गजरात निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे महापालिकेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.
भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ महापालिकेच्या वतीने नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. याठिकाणी परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये संत ज्ञानेश्वर भाजी मंडई, कानिफनाथ मित्र मंडळ, श्रीगणेश मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, पठारे लांडगे तालीम, लांडगे लिंबाची तालीम आदी प्रमुख गणेश मंडळांचा समावेश होता. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, श्रीनिवास दांगट, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी नाना मोरे, कार्यकारी अभियंता महेश काळे, शिवराज वाडकर, सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. दुपारी ४.३० वाजता गणेश मंडळे येण्यास सुरुवात झाली.
मुर्ती संकलन केंद्र अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तसेच यावर्षी पहिल्यांदाच महापालिकेच्या वतीने ८ क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या विघटन केंद्रांवर गणेश मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यात येणार आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला मंडळांनी प्राधान्य देत कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जित केल्या. बहुतांश मंडळांनी महापालिकेच्या मुर्ती संकलन केंद्रावर आणि स्वयंसेवी संस्थांकडे विसर्जनासाठी मूर्तीदान करण्यावर भर दिला.
क्षेत्रीय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली सर्व विसर्जन घाटांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. जीवरक्षक, अग्निशमन दल, सुरक्षा दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक, आरोग्य पथक, महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह यंत्रणा याठिकाणी तैनात करण्यात आली होती.

