⟩ आढावा बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले निर्देश
छत्रपती संभाजीनगर,दि.02: निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशांचा वापर होण्याची शक्यता असू शकते,अशा संभाव्य ठिकाणी विविध सर्व्हेक्षण पथकांमार्फत करडी नजर ठेवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणुका व्हाव्या, या हेतूने जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणी होत आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली असून निरीक्षक जिल्ह्यात दाखल होऊन त्यांचे कामकाजही सुरु झाले आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षक कोटापट्टी वाम्शी क्रिष्णन व सोभान सुत्रधार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, खर्च निरीक्षण नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
निर्देश देण्यात आले की, शहरातील व विविध मतदार संघातील असे क्षेत्र जेथे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभन म्हणून पैशांचा वापर झाला आहे, अथवा तसे होत असल्याची पार्श्वभुमी वा शक्यता आहे अशा ठिकाणी सर्व्हेक्षण पथकांची गस्त वाढवणे, पोलीस व सुरक्षा दलांची संख्या वाढवणे, असे भाग सिसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निरीक्षणात आणणे अशा उपाययोजना राबवाव्या. तसेच या भागात गुप्त माहिती कळविणारे दूत नेमून त्यांच्याद्वारे मिळणारी माहिती, नागरिकांकडून मिळणारी गुप्त माहिती या आधारे कारवाई करावी. रोख रकमांची होणारी वाहतुक याबाबत रिजर्व बॅंक तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार कारवाई करावी. त्यादृष्टिने संबंधित क्षेत्रातील पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करावे,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

