- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या कार्यतत्परतेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात
- शांतता राखण्याचे केले आवाहन
परभणी,दि.12: दि. 10 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाच्या प्रतिकृतीची माथेफिरू इसमाने केलेल्या विटंबनेनंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व समाजबांधवांच्या भावना समजून घेतल्या.
दिनांक 11 डिसेंबर रोजी आंबेडकरी अनुयायी यांच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात तसेच परभणी शहरात आंदोलन, रास्ता रोको करण्यात आले, परंतु त्यास हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, प्रभारी पोलिस अधीक्षक आणि संपूर्ण प्रशासनाने सदरील परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळून पुढे होणारा मोठा अनर्थ टाळला.
त्याचप्रमाणे तात्काळ जमावबंदीचे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेत. तसेच मनपा आयुक्त व तहसीलदार, परभणी यांना तात्काळ सूचना करून उद्यापासून आज झालेल्या आंदोलनातील नुकसानीचे पंचनामे करण्यास तात्काळ सूचना दिल्यात.. तसेच संबंधित माथेफिरू इसमाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील पोलीस प्रशासनाला दिले आहेत. सध्या जिल्हाधिकारी यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र शांतता असून सर्वांना शांतता व सौहार्दाचे वातावरण राखण्यास जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

