भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सचिन काळभोर यांना ‘घरचा रस्ता’ दाखवला जाणार?

0 झुंजार झेप न्युज

भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सचिन काळभोर यांना ‘घरचा रस्ता’ दाखवला जाणार?


पिंपरी-चिंचवड : महेश लांडगे आणि भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजपकडून लवकरच ७ नावांची घोषणा होण्याची शक्यता असून, त्या यादीत सचिन काळभोर यांचे नाव नसल्याचे संकेत विशेष सूत्रांकडून मिळत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून महेश लांडगे आणि सचिन काळभोर यांच्यात राजकीय मतभेद असल्याची चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान काळभोर यांनी भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका घेत थेट देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केल्याचे बोलले जाते. त्यानंतर दोन्ही गटांमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, स्वीकृत नगरसेवक पदांसाठी महेश लांडगे आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे महेश लांडगे यांच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या सचिन काळभोर यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही निगडी गावठाण प्रभाग क्रमांक १३ मधून काळभोर यांना निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते.

दरम्यान, शंकर जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून सचिन काळभोर यांची ओळख असल्याने भाजपमधील गटबाजी पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. शहरातील चार आमदार आपापल्या गटातील कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उद्याच्या स्थायी समिती सभेत स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबत ठराव न आल्याने संभ्रम अधिक वाढला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन नावांची चर्चा सुरू झाली असून भाजपमध्ये मात्र अद्याप अंतिम निर्णय स्पष्ट झालेला नाही.

एकाच पक्षात काम करणारे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उघड भूमिका घेत असल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. भाजपमधील ही अंतर्गत लढाई खरोखरच वैचारिक आहे की केवळ राजकीय दबावतंत्र, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.