महापौर रवी लांडगे यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; सचिन काळभोर यांनी केली मोठी मागणी
पिंपरी चिंचवड,दि. 20 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना विशेष पोलीस सुरक्षा देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. समाधान हेल्पलाईनवर फोन करून संबंधित धमकी देण्यात आल्याचे समोर आले असून संबंधित व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचेही निदर्शनास आले आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून महापौरांना विशेष सुरक्षा देणे आवश्यक असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
महापौर हे शहरातील अत्यंत महत्त्वाचे पद असून नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महापौर रवी लांडगे अहोरात्र शहरात फिरून काम करत आहेत. अनेक ठिकाणी नागरी प्रश्न सोडवताना अडचणी आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने विशेष सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले असल्याची माहिती सचिन काळभोर यांनी दिली. सामान्य नागरिकांच्या नागरी समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी महापौरांना निर्भयपणे काम करता यावे, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशीही त्यांनी नम्र विनंती केली आहे.

