पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उद्या उच्चस्तरीय बैठक; महापौरांसह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींना निमंत्रण
पिंपरी, दि. २ जुलै : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री सचिवालयामार्फत अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे.
या बैठकीस महापौर श्री. रवि लांडगे यांच्यासह खासदार श्री. श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, आमदार श्री. महेश लांडगे, श्री. शंकर जगताप, श्रीमती उमा खापरे, श्री. अमित गोरखे तसेच उपमहापौर श्रीमती शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती श्री. अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते श्री. प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते श्री. भाऊसाहेब भोईर आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे उपस्थित राहणार आहेत.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यातील सुरक्षित, शाश्वत आणि अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सध्या खुल्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने पाणीगळती, बाष्पीभवन, अतिक्रमणे, प्रदूषणाचा धोका तसेच देखभालीतील अडचणी निर्माण होत आहेत. बंदिस्त जलवाहिनीची उभारणी झाल्यानंतर या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होणार असून, पाण्याची बचत, जलवाहतुकीची कार्यक्षमता आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ पाणीपुरवठ्याचा नसून पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन जलसुरक्षेचा भक्कम पाया मानला जात आहे.
या प्रकल्पास गती मिळावी यासाठी महापौर श्री. रवि लांडगे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी यांनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला असून, प्रकल्पावरील प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री स्तरावर चर्चेस यावेत यासाठीही प्रयत्न केले आहेत.
यासंदर्भात महापौर श्री. रवि लांडगे म्हणाले, “पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा व्यक्तीचा विषय नसून पिंपरी-चिंचवडच्या लाखो नागरिकांच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शहराच्या विकासासाठी आणि भावी पिढ्यांच्या पाणीसुरक्षेसाठी हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व लोकप्रतिनिधी एकत्रितपणे शासनासमोर शहराची भूमिका मांडणार असून, प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत गती मिळावी, हीच आमची भूमिका आहे.”
महापौरांनी पुढे सांगितले की, मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय कृती समितीकडून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील विविध मागण्या व निवेदने त्यांना प्राप्त झाली आहेत. त्या मागण्यांमधील सर्व मुद्देही मा. मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील पाणीसुरक्षा अबाधित राखतानाच मावळ परिसरातील शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि न्याय्य मागण्यांचाही सकारात्मक विचार व्हावा, यासाठी सर्व संबंधित घटकांना न्याय मिळेल असा समन्वयात्मक व सर्वमान्य मध्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संवादाच्या माध्यमातून सर्वांच्या हिताचे समाधानकारक समाधान शोधणे हीच आमची भूमिका राहील.”
उद्याच्या बैठकीमध्ये प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील प्रलंबित प्रशासकीय व तांत्रिक बाबी, आवश्यक मंजुरी, निधीची उपलब्धता, विविध विभागांतील समन्वय, कामाच्या अंमलबजावणीचा कालबद्ध आराखडा तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निर्णय यावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
महापौर श्री. रवि लांडगे यांच्यासह सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा विषय मुख्यमंत्री स्तरावरील बैठकीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीतून प्रकल्पास आवश्यक गती मिळून पिंपरी-चिंचवडकरांच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नाच्या निराकरणासाठी ठोस, सकारात्मक आणि सर्वसमावेशक निर्णय होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
