भाजप शहर संघटनेतील प्रवक्तेपद चर्चेत
• एकाच पदावर दोन नियुक्त्यांचा दावा
• अधिकृत भूमिका कोण मांडणार?
• कार्यकर्त्यांच्या संभ्रमाबाबत प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
पिंपरी चिंचवड,दि.07:भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेतील प्रवक्तेपदाच्या नियुक्तीवरून पक्षाच्या वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शहर कार्यकारिणीमध्ये एकाच पदावर दोन व्यक्तींची नियुक्ती झाल्याचा दावा करण्यात येत असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते सचिन सुदाम काळभोर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार करून या प्रकरणाची दखल घेण्याची आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी भाजप पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीत कुणाल दशरथ लांडगे यांची शहर प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी राजू अनंत दुर्गे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकाच पदावर दोन नियुक्त्या झाल्याचा मुद्दा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
कोणत्याही राजकीय पक्षासाठी प्रवक्त्याचे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पक्षाची अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडणे, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणे, पत्रकार परिषदांमधून तसेच सोशल मीडियावर पक्षाची भूमिका स्पष्ट करणे ही प्रवक्त्याची प्रमुख जबाबदारी असते. अशा परिस्थितीत दोन प्रवक्त्यांच्या नियुक्तीमुळे अधिकृत भूमिका नेमकी कोण मांडणार, असा प्रश्न काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांत पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामे आणि राजकीय घडामोडींवरून वातावरण तापले होते. मोशी कचरा डेपो, छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा प्रकल्प, सांगवी येथील शितोळे सरकार उड्डाणपूल तसेच महापालिका प्रशासन भवनातील आंदोलन यांसारख्या विषयांवर विरोधकांनी भाजपवर सातत्याने टीका केली होती. अशा वेळी पक्षाची अधिकृत आणि प्रभावी भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती.
याशिवाय, काही सार्वजनिक कार्यक्रमांमधील राजकीय घडामोडींमुळेही शहर भाजपमध्ये अंतर्गत चर्चांना वेग आला होता. त्यातच नव्या प्रवक्त्याच्या नियुक्तीची घोषणा झाल्याने संघटनात्मक समन्वय, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि पक्षाच्या अधिकृत संवाद व्यवस्थेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, दोन प्रवक्त्यांच्या नियुक्तीबाबत भाजपकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. ही नियुक्ती संघटनात्मक विस्ताराचा भाग आहे की जबाबदाऱ्यांचे स्वतंत्र विभाजन करण्यात आले आहे, याबाबत पक्ष नेतृत्वाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पक्ष नेतृत्व याप्रकरणी कोणती भूमिका घेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम कशाप्रकारे दूर केला जातो, याकडे आता राजकीय वर्तुळासह पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

