निगडी चौकात सचिन काळभोर मित्र परिवाराकडून तिरंगा वाटप; देशभक्तीचा उत्साह
पिंपरी चिंचवड,निगडी | प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निगडी चौक परिसरात सचिन काळभोर मित्र परिवाराच्या वतीने नागरिकांना तिरंगा ध्वजांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मित्र परिवारातील कार्यकर्त्यांनी निगडी बसस्थानक परिसरात नागरिकांना तिरंगा ध्वज देत राष्ट्रप्रेम, एकता आणि देशभक्तीचा संदेश दिला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या भावनेला बळ देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
तिरंगा हातात घेत नागरिकांनीही देशप्रेम आणि राष्ट्राभिमान व्यक्त केला. त्यामुळे निगडी चौक परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी सर्वधर्म एकता मंचाच्या वतीनेही नागरिकांना मोफत तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले. विविध समाजघटकांनी एकत्र येत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
देशभक्तीची भावना समाजात अधिक दृढ व्हावी आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेची भावना वाढीस लागावी, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे सचिन काळभोर मित्र परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
या उपक्रमात सचिन शिंदे, रफिक शेख, दिलीप महाडीक, सुधीर भोसले, पप्पू हतागळे, विकास कांबळे, जयदेव भुवड, गौरव रोधाळे, सुरेश चव्हाण, सचिन काळभोर आणि राहुल सोनवणे यांच्यासह मित्र परिवारातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

