मोशीतील संभाजी महाराज स्मारक परिसरातील प्रस्तावित कार्यक्रमावर आचारसंहितेची हरकत
पिंपरी-चिंचवड, दि.01प्रतिनिधी : निवडणूक आचारसंहिता लागू असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व स्मारक परिसरात ४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रस्तावित करण्यात आलेल्या मानवंदना, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमावर हरकत घेण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे निवेदन सादर करून या कार्यक्रमाची आचारसंहितेच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काळभोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, मोशी येथील महानगरपालिका मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात ‘छोल लेझीम पथका’च्या माध्यमातून सुमारे पाच हजार खेळाडूंच्या सहभागाचा मानवंदना, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तावित आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात आमदार महेश लांडगे व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
आचारसंहिता लागू असताना कार्यक्रमाला परवानगी कशी?
स्मारक परिसर महानगरपालिकेच्या अखत्यारित असल्याचे नमूद करत काळभोर यांनी कार्यक्रमासाठी परवानगी कोणत्या प्राधिकरणाने दिली, कोणत्या प्रशासकीय आदेशानुसार जागेचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आणि परवानगीच्या अटी-शर्ती काय आहेत, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
स्मारकाचे बांधकाम व सुशोभीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचे तसेच उद्घाटनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने नागरिक व खेळाडूंच्या सहभागाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्यास, त्यामागील प्रशासकीय प्रक्रिया तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा निवडणूक प्रचाराशी संबंध आहे का?
प्रस्तावित कार्यक्रमाचा निवडणूक प्रचाराशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, तसेच त्यातून कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीला प्रचारात्मक लाभ मिळण्याची शक्यता आहे का, याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची मागणी काळभोर यांनी केली आहे.
तसेच कार्यक्रमासाठी महानगरपालिका किंवा अन्य शासकीय यंत्रणेच्या मनुष्यबळाचा, साधनसामग्रीचा अथवा अन्य सुविधांचा वापर करण्यात आला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची मागणी
कार्यक्रमाला परवानगी देताना महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा इतर संबंधित यंत्रणांनी निवडणूक आचारसंहितेतील तरतुदींचा विचार केला होता का, याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमासंदर्भातील परवानगी आदेश, अर्ज, आयोजकांची माहिती, कार्यक्रमाचे स्वरूप आणि प्रशासकीय मंजुरीची कागदपत्रे तपासावीत. चौकशीत आचारसंहितेचे उल्लंघन किंवा नियमबाह्य परवानगी आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करावी. तसेच परवानगी देताना संबंधित अधिकाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यक्रमाला स्थगितीची मागणी
कार्यक्रमात हजारो नागरिक व खेळाडू सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेता, कार्यक्रमापूर्वीच त्याची कायदेशीरता, परवानगी प्रक्रिया आणि आचारसंहितेच्या अनुषंगाने तपासणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत कार्यक्रमास स्थगिती देण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा आणि तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती द्यावी, अशी मागणीही सचिन काळभोर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान, काळभोर यांच्या निवेदनातील आरोप व हरकतींची सत्यता संबंधित प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. या निवेदनात कार्यक्रमाचे आयोजक किंवा संबंधित प्रशासनाची बाजू उपलब्ध नसल्याने त्यांचे म्हणणे स्वतंत्रपणे समोर येणे अपेक्षित आहे.

