डॉक्टर व अधिकाऱ्यांसाठी १९ खासगी वाहने भाडेतत्त्वावर; खर्च आणि निविदा प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करण्याची सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह (YCM) इतर रुग्णालये व वैद्यकीय विभागातील डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या वापरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या खासगी वाहनांच्या खर्चाबाबत चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
महापालिकेच्या रुग्णालये व वैद्यकीय विभागासाठी सध्या १९ खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेऊन वापरली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वाहनांवर सार्वजनिक निधीतून मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने वाहनांची आवश्यकता, वापर, निविदा प्रक्रिया, ठेकेदाराला करण्यात येणारे भुगतान तसेच इंधन व देखभाल खर्च याबाबत सविस्तर माहिती समोर आणावी, अशी मागणी काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
काळभोर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात YCM तसेच महापालिकेच्या इतर रुग्णालये व वैद्यकीय विभागासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या वाहनांची रुग्णालयनिहाय आणि विभागनिहाय संख्या जाहीर करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक वाहनाचा प्रकार, कंपनी, मॉडेल, वाहन क्रमांक तसेच कोणत्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी अथवा विभागाच्या वापरासाठी वाहन देण्यात आले आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निविदा प्रक्रिया आणि ठेकेदाराची माहिती मागितली
वाहने भाडेतत्त्वावर घेण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली आहे का, निविदा क्रमांक, निविदा प्रसिद्धीची तारीख, अंदाजित व मंजूर किंमत, निविदेतील अटी-शर्ती आणि कार्यादेशाची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित ठेकेदाराचे नाव, L1 ठेकेदाराची निवड, कराराची मुदत, कराराची रक्कम आणि करारातील अटी याची माहिती देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वाहनांवरील एकूण खर्चाची तपासणी करण्याची मागणी
प्रत्येक वाहनासाठी प्रतिदिन किंवा प्रतिमहिना किती भाडे अदा केले जाते, चालकाचा पगार, इंधन, वाहन देखभाल, दुरुस्ती, विमा आणि इतर अनुषंगिक खर्च कोणाच्या जबाबदारीचा आहे, याची माहितीही मागण्यात आली आहे.
याशिवाय मागील कालावधीत या वाहनांवर महापालिकेने केलेला एकूण खर्च वर्षनिहाय आणि विभागनिहाय जाहीर करावा, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.
लॉगबुक व बिलांच्या पडताळणीचा मुद्दा
भाडेतत्त्वावरील वाहनांचा प्रत्यक्ष वापर कोणत्या महापालिका अथवा शासकीय कामासाठी केला जातो, वाहनांच्या वापरासाठी लॉगबुक ठेवले जाते का, वाहनांचे लॉगबुक, देयके आणि बिलांची पडताळणी कोणत्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली केली जाते, तसेच ठेकेदाराला भुगतान करण्याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या आर्थिक व खरेदी नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी करून आवश्यकता असल्यास स्वतंत्र प्रशासकीय चौकशी करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
“सार्वजनिक निधीच्या खर्चात पारदर्शकता आवश्यक”
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक निधीचा वापर केला जातो. त्यामुळे वाहन भाड्यावर होणारा खर्चही आवश्यक, नियमबद्ध आणि पारदर्शक आहे की नाही, याची खातरजमा होणे आवश्यक असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
“या मागणीचा उद्देश कोणत्याही व्यक्ती अथवा ठेकेदारावर पूर्वग्रहदूषित आरोप करणे नसून, सार्वजनिक निधीतून होणाऱ्या खर्चाची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांसमोर यावी आणि संपूर्ण प्रक्रिया महापालिका नियमांनुसार झाली आहे की नाही, याची खातरजमा व्हावी,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
भाडेतत्त्वावरील १९ वाहनांच्या व्यवस्थेची सविस्तर चौकशी करून, संबंधित माहिती सार्वजनिक करावी तसेच चौकशीत काही अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी मागणी सचिन काळभोर, भाजपा कार्यकर्ता, पिंपरी-चिंचवड शहर यांनी केली आहे.

