दुष्काळसदृश परिस्थितीत मच्छीमारांच्या घरी मंत्र्यांची दिवाळी! नितेश राणे यांनी कोळी कुटुंबीयांसोबत साजरा केला सण
मुंबई : अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसोबतच मच्छीमार बांधवांनाही बसत आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमार कुटुंबीयांना आधार देण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री नितेश राणे यांनी वर्सोवा कोळीवाड्यातील शकुंतला तोंबरी आणि विजय तुका यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मच्छीमार बांधवांच्या व्यावसायिक तसेच कौटुंबिक अडचणी जाणून घेतल्या.
दिवाळीनिमित्त मंत्री राणे यांच्या हस्ते मच्छीमार कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. मच्छीमार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असून, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच मच्छीमार बांधवांनी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.
दिवाळीच्या आनंदात मच्छीमार कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या या उपक्रमातून शासन मच्छीमार बांधवांच्या पाठीशी असल्याचा संदेश देण्यात आला.

