महायुतीतील मतभेद सोशल मीडियावर नकोत; धमकीची भाषा टाळून समन्वयातून मार्ग काढा!
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी दि.01: महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि प्रवक्त्यांमध्ये निर्माण होणारे मतभेद सार्वजनिक व्यासपीठावर किंवा सोशल मीडियावर चव्हाट्यावर आणण्याऐवजी समन्वयातून सोडवावेत. मित्रपक्षातील प्रवक्त्यांना थेट धमकी देण्याची भाषा योग्य नाही. रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांना दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संयम बाळगून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मांडली आहे.
काळभोर यांनी म्हटले आहे की, आपण सर्वजण महायुती सरकारमध्ये एकत्र काम करत आहोत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट राजकीय मुद्द्यावर चर्चा करताना प्रत्येकाने संयम आणि परस्पर आदर राखणे आवश्यक आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये काही विषयांवर मतभेद किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात; मात्र त्यावरून टोकाची भूमिका घेणे किंवा सोशल मीडियावर थेट धमकी देणे योग्य नाही. अशा प्रकारच्या वादांचा फायदा विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना होऊ शकतो. त्यामुळे मित्रपक्षांमधील मतभेद वाढविण्याऐवजी ते सामंजस्याने मिटविण्याची गरज आहे.
*समन्वय समितीसमोर विषय मांडावा*
महायुती सरकारमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही घटक पक्षाला एखाद्या नेत्याबद्दल, प्रवक्त्याबद्दल किंवा कार्यकर्त्याबद्दल हरकत असेल, तर संबंधित मुद्दा समन्वय समितीसमोर मांडावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच अन्य वरिष्ठ सहकारी नेत्यांशी चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन काळभोर यांनी केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणातील भूमिका सविस्तर मांडता येऊ शकते. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप करून महायुतीच्या एकोप्यात मिठाचा खडा टाकू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
*भाजपच्या पक्षसंस्कृतीत मित्रपक्षांचा सन्मान महत्त्वाचा*
भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपली संस्कृती आणि परंपरा जपणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. मित्रपक्षांतील नेते, आमदार, खासदार, मंत्री, प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांचा आदर करणे ही भाजप कार्यकर्त्यांची भूमिका आहे. नवनाथ बन हे भाजपचे अधिकृत प्रवक्ते असल्याने त्यांचाही सन्मान राखला गेला पाहिजे, असे काळभोर यांनी नमूद केले.
ते म्हणाले, “मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मात्र महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकमेकांचा आदर राखावा, ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. एकनाथ भाई शिंदे हे आमचेही नेते आहेत. त्यांच्या तसेच त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाचा आणि योगदानाचा आम्ही आदर करतो. त्यामुळे कोणताही गैरसमज असल्यास तो वरिष्ठ पातळीवर चर्चेतून दूर करावा.”
*पदवीधर निवडणुकीतील पराभवावरून वाद नको*
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिता जाधव यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अशा प्रकारचे वाद वाढविण्यापेक्षा त्यातून धडा घेण्याची गरज आहे. पराभवाची कारणे शोधणे, महायुतीतील समन्वयातील त्रुटी तपासणे आणि भविष्यातील निवडणुकांसाठी अधिक प्रभावी रणनीती आखणे महत्त्वाचे आहे, असे काळभोर यांनी सांगितले.
महायुतीतील घटक पक्षांनी आगामी निवडणुकांमध्ये अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी एकदिलाने काम करावे. स्थानिक पातळीवरील मतभेद, नाराजी आणि गैरसमज यांचा परिणाम राज्यातील राजकीय समीकरणांवर होऊ नये, यासाठी प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
*‘विरोधकांना आयते कोलीत देऊ नका’*
महायुतीतील नेत्यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करण्याऐवजी थेट संवाद साधावा. कोणतीही तक्रार असल्यास ती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवावी. धमकी, आरोप-प्रत्यारोप आणि टोकाच्या विधानांमुळे महायुतीतील एकोपा कमकुवत होऊ शकतो. त्याचा राजकीय फायदा विरोधक घेऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी संयमाची भूमिका स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन सचिन काळभोर यांनी केले आहे.

