नगरमध्ये काँग्रेसचे बडे नेते म्हणून ओळखले जाणारे आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांच्या जागी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सतेज पाटील यांच्या जागी भंडार्याचे पालकमंत्री म्हणून डॉ. विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री जाहीर केले होते. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूरचे तर नगरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले होते. थोरात हे नगरमध्ये काँग्रेसचे तर मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे कोल्हापूरमधील बडे नेते म्हणून ओळखले जातात. नगरऐवजी कोल्हापूर जिह्याचे पालकमंत्रीपद दिल्याने थोरात नाराज झाले होते. त्यामुळे थोरात यांनी ते पद स्वीकारण्यास नकार देत त्याऐवजी आमच्या पक्षातीलच इतर मंत्र्यांना ते पद दिले जाईल, असे सांगितले होते.

