शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयनराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला असून उदयनराजे यांनी आपण छत्रपतींचे वंशज असल्याच पुरावे आणावेत, अशी मागणी केली होती. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले होते.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्यावर भाजपकडून हल्लाबोल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागितल्यानंतर साताऱ्याचे रहिवासी संतापले आहेत. तसेच भाजप आमदार राम कदम पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.
तसेच आमदार प्रसाद लाड देखील सायन पोलिस स्टेशन बाहेर उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे सध्या उदयनराजे यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. राऊतांच्या या वक्तव्यावर टीका करत आमदार प्रसाद लाड म्हणाले की, 'संजय राऊत त्यांचं आडनाव बदलून खान करणार असावेत. छत्रपतींच्या विरोधात बोलणारी ही मुघलांची औलाद आहे. छत्रपतींवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केलं, शिवसेना छत्रपतींच्या आशीर्वादाने बनवली. त्याचं पक्षाचे खासदार छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागतात. याचाच अर्थ सत्तेसाठी लाचार असलेली मुघलांची औलाद आहेत.'
दरम्यान, शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील पोवई नाका परिसरात निदर्शने करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे राजवाडा येथे गांधी मैदानावर उदयनराजे समर्थक मोठ्या प्रमाणात जमणार आहेत. यानंतर साताऱ्यातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

