मुंबई, 19 जानेवारी: कडाक्याच्या थंडीत मुंबई 17 व्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत देश-विदेशातील एकूण 55 हजार 322 धावपटू सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सुरुवात झाली आहे. तर वरळी डेअरी इथून अर्धमॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत गुलाबी थंडीत धावण्यासाठी मुंबईकरांनीही मोठा उत्साह दाखवला आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच, दोन हजार अतिरिक्त पोलिस, 600 वाहतूक पोलिस, 3 हजार स्वयंसेवक, 300 वॉर्डन तसेच राखीव पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंबईत शनिवारी 12 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. गुलाबी थंडीमध्ये 55 हजारहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेमध्ये पोलीस, डॉक्टर, वेगवेगळ्या पदावरचे अधिकारीही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सकाळच्या वेळात वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये काही बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या संदर्भातील माहिती ट्वीट करून दिली आहे.
प्रिय मुंबईकर ,
दि. १९/०१/२०२० रोजी होत असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने सकाळी ०४:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत मुंबई मध्ये खाली नमूद मार्गांवरती वाहतूक प्रतिबंधित अथवा पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली असून सदर बाबत नोंद घ्यावी.
See Mumbai Police's other Tweets
42.195 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये 9 हजार 660 धावपटू, 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये 15 हजार 260 तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या 'ड्रीम रन'मध्ये 19 हजार 707 स्पर्धक, 10 किमी शर्यतीत 8 हजार 032, ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमध्ये 1 हजार 022 आणि अपंगांच्या शर्यतीत 1 हजार 596 धावपटू सहभागी होणार आहेत. गतवर्षीचे विजेते केनियाचा कॉसमस लगट आणि इथिओपियाची वर्कनेश अलेमू यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या वर्षी या दोघांनी मुंबई मॅरेथॉनमधील सर्वात वेगवान वेळेची नोंद केली होती.


