भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. फोन टॅपिंग आणि स्नूपिंग झालेल्या नेत्यांमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सरकारने सरकारी यंत्रणेचा वापर करून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी इस्रायलमधून आणलेल्या सॉफ्टवेअरचा वापर करून विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप खुद्द दिग्विजय सिंग यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
त्याचवेळी गृहमंत्री देखमुख यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणाचीही नव्याने चौकशी करण्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, कोरेगाव-भीमा प्रकरणाकडे संशयाने पाहिले जात आहे. आमच्याकडे अशाप्रकारची अनेक निवेदने आली आहेत. भाजप विरोधात कुणीही विचार मांडले तर त्याला अर्बन नक्सल म्हणायचे, अशी फडणवीस सरकारची भूमिका होती. त्यामुळे या सगळ्याची योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहितीही यावेळी देशमुख यांनी दिली.

