प्रतिनिधी :
पुणे : चंद्रपूरची दारूबंदी हटवण्यासाठी जे मंत्री पुढाकार घेतील त्यांना भूमाता ब्रिगेडच्या महिला मंत्रालयात जाऊन दारू पाजतील, असा इशारा भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारला दिला आहे.
महसूलसाठी अनेक चांगले पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. चंद्रपूरची दारुबंदी हटवू नये, महिलांचा शाप असलेला पैसा महसूल म्हणून स्वीकारू नये. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बिहार आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात दारूबंदी करावी, अशी विनंती तृप्ती देसाई यांनी केली आहे.
सरकारने उत्पन्न वाढीसाठी पापाच्या कराचा आधार घेऊन हजारो कुटुंबं उद्ध्वस्त करु नयेत, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, दारुबंदीमुळे गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात 200 कोटी रुपयांचा महसूल बुडाला. बेकायदा विक्रीमुळे महसूल बुडत असल्याचं निरीक्षण समोर आल्यानंतर महसूलवाढीसाठी ठाकरे सरकारने दारुबंदी हटवण्याचा फंडा वापरला असल्याचं समजत आहे.

