पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी कमी झाले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार प्रतिलिटर पेट्रोल २४ पैशांनी तर डिझेल २६ पैशांनी स्वस्त झाले आहे.
मुंबईत प्रति लिटर डिझेलचा दर ६६.२४ पैसे तर दिल्लीत ६३.२६ पैसे आहे. मुंबईत प्रति लिटर पेट्रोल ७६.२९ पैसे तर दिल्लीत ७०.५९ पैसे आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज बदल होत असतात.
महाराष्ट्रात इंधनावरील व्हॅट वाढवण्यात आला आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प मांडताना ही घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर एक रुपयांनी वाढणार आहेत.
कशामुळे दरांमध्ये घसरण?
एकेकाळचा सहकारी असलेल्या रशिया विरोधात सौदी अरेबियाने दर युद्ध सुरु केले आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. अमेरिकेत तेलाचे दर २७ टक्क्यांनी कोसळले आहेत. चार वर्षातील हे नीचांकी दर आहेत.
कच्चा तेलाचा दर प्रतिपिंप ३२ डॉलरपर्यंत कोसळला आहे तेच ब्रेन्ट क्रूड ऑइलच्या दरात २२ टक्के घसरण झाली आहे. प्रतिपिंप ब्रेन्ट क्रूड ऑइल दर ३५ डॉलर आहे. १९९१ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात इतकी मोठी घसरण झाली आहे.

