पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेतृत्वावरच बोट; आंदोलने, मोर्चे करूनही कार्यकर्ते तिकीटापासून वंचित

0 झुंजार झेप न्युज

भाजपमध्ये तिकीट वाटपावरून असंतोषाचा भडका; ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप



पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत तिकीट वाटपावरून मोठा असंतोष उफाळून आला आहे. शहर भाजपच्या कार्यकारिणीतच निष्ठावंत कार्यकर्त्यांना ऐनवेळी वेठीस धरून ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप भाजपमधीलच कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विशेषतः भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट जाहीर करून जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने भाजपमध्ये खदखद वाढली आहे.


महापालिका निवडणुकीत भाजपसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून देण्यासाठी रस्त्यावर उतरले. आंदोलने, मोर्चे, आंदोलनात गुन्हे दाखल होण्याची जोखीम पत्करत त्यांनी पक्षसंघटन मजबूत केले. मात्र, त्याच कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या वेळी डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजी तीव्र झाली आहे.


निगडी येथील भाजप कार्यकर्ता सचिन काळभोर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांत शहरातील विविध नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आंदोलने केली. रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित भूखंडांचे क्षेत्र कमी करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणे, निगडी ते पिंपरी मेट्रो मार्गावरील खड्ड्यांबाबत महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलनाचा इशारा देऊन रस्त्यांची दुरुस्ती करून घेणे, पीसीएमसी कॉलनीतील धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा करणे, अण्णा भाऊ साठे वसाहतीतील नागरिकांसाठी एसआरए प्रकल्पाची मागणी करणे, अशी अनेक आंदोलने त्यांनी केली.


याशिवाय यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवारा केंद्र, यमुना नगर व भोसरी रुग्णालयात वैद्यकीय सुविधा, आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव सुरू करणे, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा, मेट्रो स्टेशनच्या नामकरणाबाबत आंदोलन, पाणी वाया जाण्याविरोधात कारवाईची मागणी, पादचारी भुयारी मार्ग, विद्युत दाहिनी सुरू करणे, घरकुल प्रकल्पातील आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणे, मालमत्ता कर दंड रद्द करण्यासाठी आंदोलन – अशी असंख्य सामाजिक व नागरी कामे त्यांनी केली आहेत.


इतके करूनही प्रभाग क्रमांक १३ मधून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने “सामान्य कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळतो का?” असा सवाल उपस्थित झाला आहे. नवीन पक्षप्रवेश केलेल्या ‘आयात’ उमेदवारांना तिकीट देऊन जुन्या कार्यकर्त्यांना केवळ निष्ठेच्या गप्पा देत गप्प बसवले जात असल्याची भावना शहर भाजपमध्ये पसरली आहे. या पार्श्वभूमीवर “भविष्यात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस न्याय देतील का?” असा थेट प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात असून, तिकीट वाटपाचा हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.