आपले शब्द, भावना सुलेखनातून मांडून आनंद मिळवा - पद्मश्री अच्युत पालव

0 झुंजार झेप न्युज


चिंचवड, सुहास एकबोटे स्टुडिओ मध्ये पालव यांचा प्रेक्षकांशी संवाद 


पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) : शब्द लिहायचे नसतात तर त्या शब्दामागची भावना लिहायची असते. जीवनात प्रत्येकाने कोणत्या ही कलेतून व्यक्त व्हावे. आपली भाषा, आपले शब्द त्यात आपली भावना सुलेखनातून मांडून आनंद मिळवता येतो. एखाद्या आवडत्या कलेबरोबर शिकत शिकत आनंद वेचला की, जगणं सोपं होतं असे प्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी सांगितले.

   निमित्त होते चिंचवड येथील एकबोटे फर्निचर स्टुडिओ मध्ये अच्युत पालव यांनी सुलेखनातून साकारलेल्या भिंतीच्या १४ व्या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालव यांनी निवडक प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी संचालक नरेंद्र एकबोटे, सुहास एकबोटे, श्रद्धा पालव, ज्येष्ठ कलाकार विकास गायतोंडे, अमोल कुलकर्णी तसेच कला आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

  यावेळी संस्थेच्या आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन पालव यांच्या हस्ते करण्यात आले. कलाकार विनोद कोचर याने पालव यांचे पिंपळाच्या पानावर काढलेले चित्र त्यांना भेट देण्यात आले. 

  श्रद्धा पालव यांनी प्रेक्षकांच्या वतीने प्रश्न विचारून अच्युत पालव यांना बोलते केले. यावेळी एक सुलेखनकार ते पद्मश्री पुरस्कार असा पालव यांचा जीवन प्रवास उपस्थिताना अनुभवता आला. यामध्ये सुलेखनाचे वर्ग घेत बीड जिल्ह्यातील वाडी, वस्तीवरील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जमिनीचा फळा करून केलेला सराव, वयाच्या ८५ व्या वर्षी देवनागरी लिपी सुलेखन शिकण्यासाठी पॅरिस ते लंडन असा रेल्वे प्रवास करून येणारी परदेशी महिला, 'गुलजार' यांच्या घरी स्वतःची सुलेखनाची वही पोहचविण्यासाठी केलेली धडपड आणि त्यानंतर गुलजार यांनी दिलेली शाब्बासकीची थाप, सुलेखन कले मुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची दिल्ली मध्ये झालेली भेट त्यांनी दिलेला आशीर्वाद असे सर्व समृद्ध अनुभव प्रेक्षकांना ऐकायला मिळाले. 

   यावेळी 'एआय' तंत्रज्ञानाचा सुलेखनावर काय परिणाम होईल यावर उत्तर देताना अच्युत पालव यांनी सांगितले की, विचार तर माणूसच करतो, रेषा अनुभवायला शिकले पाहिजे. अक्षरं तुमच्याशी बोलतात म्हणून तुम्ही देखील त्यांच्याशी बोलून पहा. वाचून काढणं वेगळं आणि वाचून घडणं वेगळं असतं. म्हणजेच एखादा नाट्य कलाकार प्रथम नाटक वाचून काढतो नंतर तो नाटक सादर करताना नाटक घडवत असतो. सुलेखनामध्ये भावना असतात शिकण्याला वय नसतं कायम शिकत राहावे असेही पालव यांनी सांगितले. 

   ज्येष्ठ कलाकार विकास गायतोंडे यांनी देखील पालव यांचे काही किस्से सांगितले.

   स्वागत सुहास एकबोटे यांनी केले तर आभार अमोल कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.