पीएमपीएल, गृहकुल योजना, बीआरटी, उद्यान-शिक्षण घोटाळे आणि पीसीएनटी जमिनीवरून गंभीर आरोप; ‘पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारांवर अजित पवार गप्प का?’ असा सवाल
पिंपरी-चिंचवड,दि.08: निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात सातत्याने टीका-टिप्पणी करत बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार सत्तेत असताना अनेक मोठ्या भ्रष्टाचाराच्या घटना घडल्या असून, त्या मुद्द्यांवर ते जाणीवपूर्वक मौन बाळगत आहेत, असा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी या वक्तव्यांचा जाहीर निषेध नोंदवला आहे.
सचिन काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीसीएमटी आणि पीएमटी या परिवहन संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून पीएमपीएल कंपनीची स्थापना करण्यात आली. या प्रक्रियेत करोडो रुपयांचा अपव्यय झाला. पीसीएमटीमधील कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात समाविष्ट करण्यात आले, मात्र त्यांना पीएमपीएलच्या नियमांनुसार वेतन देण्यात येत आहे. सध्या २५६ कर्मचारी महापालिकेत कार्यरत असून, वेतनातील विसंगतीमुळे कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर भरडला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयांमुळे पीएमपीएल आर्थिक डबघाईला आल्याचेही त्यांनी नमूद केले.
जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत निगडी सेक्टर २२ मधील रेड झोन संरक्षण क्षेत्रात घरकुल प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पावर करोडो रुपये खर्च करण्यात आला, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिली आहे. परिणामी हा संपूर्ण खर्च वाया गेला असून, यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. गेली १४-१५ वर्षे झाली तरी ९२० पात्र लाभार्थ्यांना अद्याप घरकुल मिळालेले नाही. या लाभार्थ्यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून वेठीस धरण्यात आल्याचा आरोप करत, हा प्रकल्प अजित पवारांच्या हट्टामुळेच रेटण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निगडी ते दापोडी बीआरटी बस मार्गाचाही उल्लेख करत, हा प्रकल्प केवळ नावापुरता असून त्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी वाया गेला, असा आरोप करण्यात आला आहे. “बीआरटीच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आला,” असा थेट आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
याशिवाय शहरातील अनेक उद्यानांचे काम, महापालिकेचे ठेके, विठ्ठल मूर्ती घोटाळा, शालेय शिक्षणातील भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांना मोफत अन्न-बिस्किटे व गणवेश वाटप प्रकरणातही अजित पवार सत्तेत असताना गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घोटाळ्यांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेची शिक्षण मंडळ समिती बरखास्त करावी लागली, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून १९७२ नंतर स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी ताब्यात घेऊन विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात आला. सुमारे ४२ हेक्टर जमीन ताब्यात घेतली असताना केवळ ११ हेक्टरवरच प्रत्यक्ष विकासकामे झाली, उर्वरित जमिनींवर अतिक्रमण व परस्पर खरेदी-विक्री व्यवहार झाले, असा गंभीर आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. आजतागायत ‘लँड डेव्हलपमेंट स्ट्रक्चर ऑडिट’ न झाल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. नंतर प्राधिकरण बरखास्त करून पीएमआरडीएत समाविष्ट करत हजारो कोटींच्या जमिनी कथितरीत्या परस्पर वाटप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, २०१७ साली पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली, कारण नागरिकांनी राष्ट्रवादीच्या कथित भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपला संधी दिली, असा दावा सचिन काळभोर यांनी केला. त्यामुळेच अजित पवार आज अस्वस्थ होऊन आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“अजित पवार यांनी भविष्यातही आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात बेछूट आरोप केले, तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. वेळ पडल्यास भोसरी विधानसभा मतदारसंघात त्यांना घेराव घालून जाब विचारला जाईल. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही,” असा इशारा देत भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला आहे.

