पुणे : शिवसेना सत्तेत आल्यानंतर १० रुपयांमध्ये पोटभर जेवण देऊ अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीवेळी केली होती. महाविकास आघाडी ने सत्ता स्थापन केल्यानंतर काहीच दिवसामध्ये 'शिवभोजन थाळी' या नावाने ही योजना सरकारने चालू केली.
याच पार्श्वभूमीवर ‘आम्ही गोर गरिबांकरता शिवथाळी योजना सुरु केली. या योजनेसाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने रोज एक लाख गरिब लोकांना दहा रुपयात थाळी देण्याचा संकल्प केला आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
तसेच शिवभोजन थाळीची योजना ज्यांच्यासाठी त्यांना याचा लाभ घेऊ द्या आणि ज्यांची ऐपत आहे, त्यांनी 50 रुपयांची राईस प्लेट खावी. याचप्रमाणे ज्यांची ऐपत आहे त्यांनी दहा रुपयांची शिवभोजन थाळी खाऊ नये", असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यशासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुकास्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार आहे तसेच शिवभोजन थाळी ही प्रायोगिक तत्वावरील योजना असून टप्प्याटप्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये भोजन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असून थाळींची संख्या देखील वाढवली आहे अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली.

