Mumbai: परराज्यातील मजुरांसाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करावी – उद्धव ठाकरे

0 झुंजार झेप न्युज


महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील कामगार आणि मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करता येईल का, याबाबत केंद्र सरकारने विचार करावा, एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे,
महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील कामगार व मजुरांची निवारा केंद्रांच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरीत कामगार आणि मजुरांची जेवणाची आणि इतर व्यवस्था केली आहे, त्यांची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिलनंतर १५ मेपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर, आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन केंद्र शासनाने या मजुरांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्याबाबत विचार करावा, असे ठाकरे म्हणाले.
अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे. आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. परराज्याप्रमाणेच राज्यातील नागरिकही जिल्ह्याजिल्ह्यांत अडकले आहेत. त्यांच्यासाठीही हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले. परराज्यातील नागरिक घरी जाताना सुरुवातीपासून शेवटापर्यंत म्हणजे त्यांच्या घरापर्यंत त्यांचे निरिक्षण करता येईल, त्यांना तिथे क्वारंटाइन करता येईल व विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेता येईल, अशी व्यवस्था करून त्यांना पाठवता येईल का, याचा विचार करून केंद्र सरकारने वेळेत निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.
राज्यातील 80 टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणेच दिसत नाहीत. यामागचे कारण काय असावे, याबाबत अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दुबई आणि अमेरिकेतून महाराष्ट्रात विषाणूचा प्रवेश झाला, त्या अमेरिकेची स्थिती माहीत आहे. पण दुबईमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, ते कुठे बरोबर आहेत आणि कुठे चुकले आहेत, याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.