सोलापूरच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बाबतचे पत्र आज काढण्यात आले आहे. यापुर्वी सोलापूरच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आव्हाड हे ताप आल्यानं खबरदारी म्हणून रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळेच दत्तात्रय भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
दत्तात्रय भरणे हे इंदापूरचे आमदार असून त्यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागलेली होती. इंदापूर विधानसभा मतदार संघात त्यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेल्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा जबरदस्त पराभव केल्यामुळेच त्यांच्या गळयात मंत्रीपदाची माळ घालण्यात आली होती. आता दत्तात्रय भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

