#पिंपरी चिंचवड #ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा वीजबिले पाठवून महावितरणाची सावकारी वसुली…

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308 

ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा वीजबिले पाठवून महावितरणाची सावकारी वसुली… 

  • महावितरणाच्या हिटलरशाही कारभाराविरोधात कार्यालयावर काढणार मोर्चा – दीपक मोढवे पाटील…

पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच महावितरण वीज कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या-सव्वा वीज बिले पाठविली आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, अशांना ही बिले भरणे कठीण झाले आहे. महावितरणाने वीज बिले भरण्यासाठी तगादा लावल्याने राज्यात आत्महत्या झाल्याच्याही घटना घडत आहेत. मात्र, महावितरणाचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही. असाच कारभार आकुर्डीतील जय गणेश व्हिजनमधील एक्सिक्यूटीव्ह कार रेंटल सर्व्हीसेस या वाहन उद्योग कार्यालयात निदर्शनास आला. २२ मार्चपासून हे कार्यालय बंद असूनही तब्बल चौ-यांशी हजार (८४०६०/-) रुपयांचे बिल महावितरणाने या ग्राहकाच्या माथी मारले आहे. तसेच थेरगावातील पाटील मल्टी कार सर्व्हिस सेंटर यांना महावितरणाने ४७१५०/- रुपयांचे बिल पाठवून शॉकच दिला आहे. या प्रकरणाचा पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शहर भाजप वाहतूक आघाडीचे अध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी निषेध केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना प्रादुर्भावाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लाकडाऊनमुळे राज्यातील व्यावसायिक, कष्टकरी, नोकरदार नागरिक गेल्या २४ मार्चपासून जवळपास चार महिने घरी बसून होते. अजूनही त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंदच आहेत. सध्याच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांचे जगणेच मुश्कील बनले असताना महावितरण वीज कंपनीचा कारभार सावकारी पद्धतीने सुरु आहे. महावितरणाच्या विद्युत विभागाकडे नियोजनच नसल्याचे दिसत येत आहे. मागील चार महिन्याचे लागून आलेले बिल व त्यातील भरमसाठ रकमेने सर्व नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.


कोरोना काळात मीटर रिडिंगची नोंद विभागाने केली नाही. मात्र, चालू महिन्यात विद्युत विभागाने सरासरी रिडिंगचे बिल पाठवले आहे. प्रत्येकाच्या बिलात वाढीव कमाल रक्कम दिसून येत आहे. प्रत्येक ग्राहकांची धाव विद्युत कार्यालयाकडे होत आहे. माझे आकुर्डीतील जय गणेश व्हिजनमधील एक्सिक्यूटीव्ह कार रेंटल सर्व्हीसेस कार्यालय २२ मार्चपासून बंद असूनदेखील तब्बल चौ-यांशी हजार (८४०६०/-) रुपयांचे बिल महावितरणाने मला पाठविले आहे. बिलाच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पाहणीसाठी कर्मचारी पाठवून देतो, असे आश्वासन दिले जाते. कर्मचाऱ्याने तपासणी केल्यानंतरही वीज बिल कमी न करता पाठविलेले वीज बिल बरोबर असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणाच्या या मनमानी कारभाराचा मी निषेध व्यक्त करतो, असे या पत्रकात दीपक मोढवे यांनी म्हटले आहे.


''कोरोनामुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद आहेत. अशातच महावितरणाने आकुर्डीतील कार रेंटल कार्यालयास ८४०६० रुपयांचे व थेरगावातील पाटील मल्टी कार सर्व्हिस सेंटर यांना ४७१५०/- रुपयांचे अव्वाच्या-सव्वा वीजबिल पाठविले आहे. माझे घरदेखील मार्चपासून बंद आहे, तरीही घरगुती वीज बिल १७६० रुपये आले आहे. याबाबत महावितरणाच्या थरमॅक्स चौकातील सबंधित कार्यालयात तक्रार केली असता उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याला जर अशी वागुणूक मिळत असेल तर, सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील. महावितरणाच्या या हिटलरशाही कारभाराविरोधात लवकरच मोर्चा-आंदोलन काढून महावितरणाचा कारभार ताळ्यावर आणणार आहे.  
– दीपक मोढवे पाटील…




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.