#crime # पिंपरी चिंचवड# पुणे# नाशिक#नाशिकच्या कुख्यात 'बुलेट राजा'ला पुण्यात अटक, 'असा' अडकला सापळ्यात

0 झुंजार झेप न्युज

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

नाशिकच्या कुख्यात 'बुलेट राजा'ला पुण्यात अटक, 'असा' अडकला सापळ्यात.

नाशिकच्या कुख्यात दुचाकी चोर बुलेट राजाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १४ महागड्या दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरलेल्या दुचाकी विकण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करत असल्याची बाब समोर आली आहे.



पुणे:  बुलेट राजा म्हणून नाशिक भागात ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात वाहनचोराला  पिंपरी -चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १० बुलेट आणि अन्य ४ अशा एकूण १७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १४ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हेमंत राजेंद्र भदाने (वय २४, रा. भोरवाडा, सातपुर, नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे उपस्थित होते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांबाबत माहिती घेत असताना भोसरी येथून महागडी दुचाकी चोरून पसार झालेला चोर भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहासमोर येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश सावंत यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हेमंत पळून जाऊ लागला. तेव्हा त्याला पकडण्यात आले.


पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली करता, त्याने १ सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने पिंपरी चिंचवड व  पुणे परीसरातुन बुलेटसह अशा महागड्या मोटरसायकली चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे या भागातील नागरीकांना कागदपत्रे नंतर देतो, असे सांगून विकल्याचे समोर आले.

पोलिसांनी धुळे, बीड, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगरमधून १० बुलेट, २ एफ झेड, एक केटीएम व एक पल्सर अशा १७ लाख ७० हजार रुपये किमतीची एकूण १४ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, वाकड, एमआयडीसी भोसरी, चाकण येथील सहा, पुण्यातील चार आणि नाशिक जिल्ह्यातील दोन असे एकूण १२ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सोशल मीडियाचा करायचा वापर


आरोपी कोणत्याही वाहनाने शहरात यायचा. पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी हेरून चोरायचा. त्यानंतर ती विकण्यासाठी सोशल मीडियावर वाहन विक्री करण्याची जाहिरात द्यायची. दुचाकी विकल्यानंतर सर्व मेसेज डिलिट करून टाकायचे अशा प्रकारे हा चोरटा वाहनचोरी करत होता. पोलिसांनी या सराईत चोराला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्या एका साथीदाराला (योगेश सुनील भामरे, वय २४, रा. धुळे) देखील पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीचे लॉक तोडायचा आणि वायरिंग जोडून दुचाकी सुरू करून चोरून न्यायचा. १२ ते १५ हजार रुपयांना तो वाहने विकत असे. नाशिक आणि ठाणे शहरात ३७ गुन्हे दाखल आहेत. २०१५ सालापासून तो वाहन चोरी करत आहे. वाहनांमध्ये तो खास करून बुलेट चोरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपीने आपला मोर्चा पुण्याकडे वळवला. इथून त्याने काही दुचाकी वाहने चोरली आहेत. सहायक निरीक्षक गणेश पाटील, फौजदार काळुराम लांडगे, कर्मचारी प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.