शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा, अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे : संजय राऊत

0 झुंजार झेप न्युज

 

शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा, अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे : संजय राऊत

.शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला (India Bandh) शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं आहे.
.कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) समर्थनार्थ उद्या भारत बंद पुकारला आहे.

मुंबई : शिवसेना पंजाब, हरयाणातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत असून शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलन याविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

या आंदोलनात सहभागी विविध पक्षांचे नेते उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत, त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले, गेल्या 11 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. दिल्लीच्या वेशीवर कडाक्याच्या थंडीत सरकारी दडपशाहीची पर्वा न करता तो संघर्ष करीत आहे. पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्याने देशाच्या अन्नधान्य उत्पादनात नेहमीच मोलाचे योगदान दिले. आज तोच शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरला आहे. जीवनमरणाचा लढा म्हणूनच तो सरकारशी दोन हात करीत आहे.

 8 डिसेंबरला 'भारत बंद' दरम्यान काय सुरू राहणार, काय बंद?
ते म्हणाले की, केंद्राने 11 दिवसांनंतरही या आंदोलनावर तोडगा काढला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरयाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरयाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे. शेतकऱ्यांनी केंद्राच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या बंदमागची भावना नाकारता येणार नाही, असं राऊत म्हणाले.

9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेणार?
राऊत म्हणाले की, कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.