कल्याण पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना जळगावहून अटक केली आहे.
कल्याण : कल्याण पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तीन जणांना जळगावहून अटक केली आहे (Marijuana Smuggler Arrested). विशेष म्हणजे गांजा विक्रीच्या धंद्यात एका महिलेसही अटक करण्यात आली आहे. गांजा तस्कर मध्य प्रदेशातून कमी भावात गांजा 25 पट अधिकच्या भावाने विकत आहे (Marijuana Smuggler Arrested).
कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांना माहिती मिळाली होती की, एक तरुण गांजा घेवून कल्याणमध्ये येत आहे. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात पोलिसांनी सापळा लावला. गांजा घेवून आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. रोशन पाटील असे या तरुणाचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून कल्याणला आला होता. त्याच्याकडून 1.75 किलो गांजा हस्तगत केला आहे. मात्र, रोशनने खुलासा केला तो धक्कादायक होता.
रोशन हा गांजा जळगावमध्ये राहणाऱ्या उषा पाटील आणि अशोक कंजर यांच्याकडून घेत होता. सहाय्यक पोलीस निरिक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक पथक जळगावला तपासासाठी गेले. जळगावहून अशोक कंजर आणि उषा पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. उषा पाटील या महिलेचा पती या व्यवसायात होता. त्याच्या मृत्यूनंतर उषा पाटीलने हा धंदा चालवला. अशोक कंजर हा मोठा गांजा तस्कर आहे. त्याच्याकडे काही दिवसांपूर्वी 116 किलो गांजा मिळून आला होता, अशी माहिती गुन्हे निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे (Marijuana Smuggler Arrested).
मध्यप्रदेशात हा गांजा 500 ते 600 रुपये किलो दराने विकत घेतला जातो. जळगावमध्ये हा गांजा 3 हजार रुपयांमध्ये विकला जातो. कल्याणात येईपर्यंत ही किंमत 13 हजार रुपये किलो होते. म्हणजे गांजाच्या व्यापारात किती बक्कळ फायदा आहे. यासाठी या गैरधंद्यात लोक उडी घेत आहेत.

