बापरे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यात कोरोना विषाणू; पालिका म्हणते, मुंबईकरांना धोका नाही!

0 झुंजार झेप न्युज

 मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाले असले तरी मुंबईतून कोरोना संसर्ग पूर्णपणे हद्दपार झालेला नाही.


मुंबई: मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाले असले तरी मुंबईतून कोरोना संसर्ग पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. आता तर मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यातही कोरोनाचे विषाणू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु, त्यामुळे मुंबईकरांना कोणताही धोका नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं आहे. मात्र, आयसीएमआरच्या अहवालातून झालेल्या या धक्कादायक खुलाश्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

मुंबईमध्ये एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमधील मलनिस्सारणाच्या पाण्यात कोरोनाचा विषाणू आढळून आल्याचे समोर आले आहे. आयसीएमआरने मुंबईमधून सहा ठिकाणी नमुने गोळा केले होते. त्या सर्वच ठिकाणी कोरोना विषाणू असल्याचे सामोर आले आहे. मात्र पालिकेकडून मलनिस्सारण वाहिनीच्या पाण्यावर प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाते. यामुळे मुंबईकरांना धोका नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आयसीएमआरचा सर्व्हे काय सांगतो?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने मुंबईत वडाळा, धारावी, कुर्ला, गोवंडीच्या शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी सर्व्हे करून त्याठिकाणच्या मलनिसारण वाहिनींच्या पाण्यांचे नमुने गोळा केले होते. त्यात १६ मार्चच्या आधी घेतलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आला नव्हता. मात्र ११ ते २२ मे दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

का करण्यात आला सर्व्हे?

कोरोना हा विषाणू नवीन असल्याने त्यावर सर्वप्रकारे अभ्यास केला जात आहे. सुरुवातीला ज्या नागरिकांना याची लागण झाली, त्यांच्या मलातून हा व्हायरस मलनिस्सारण वाहिनीत गेला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाबाधिताच्या मलातून हा विषाणू मलनिस्सारण वाहिन्यात गेला असावा त्यामुळे मलनि:स्सारण वाहिन्यांत उतरणाऱ्या, मलनिस्सारणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याची लागण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली गेली होती. त्यानुसार आयसीएमआरने याबाबत अभ्यास सुरु केला होता. त्या अभ्यासातून मलनिस्सारण वाहिन्यांमध्येही कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो हे समोर आले आहे.

मुंबईकरांना धोका नाही

मुंबईत सहा ठिकाणी घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळल्याचे म्हटले आहे. त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, असा अहवाल आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही, असा अहवाल आला असल्यास हा अहवाल जुना असेल. मुंबई महापालिका मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करते. प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा मुंबईकर नागरिकांशी थेट संपर्क येत नाही. यामुळे मुंबईकरांना याचा धोका नाही. मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात सुमारे एक टक्के कर्मचारीच पॉझिटिव्ह आढळतात. यामुळे भीतीचे काहीही कारण नाही, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.