भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांना कोरोनाची लागण; ट्विटरवरून दिली माहिती

0 झुंजार झेप न्युज

 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांना कोरोनाची लागण; ट्विटरवरून दिली माहिती

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे.पी.नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन केलं आहे. आपली प्रकृती स्थिर असून काळजी करू नये, असं त्यांनी म्हटलं असून तसं ट्विटच त्यांनी केलं आहे. 

जे. पी. नड्डा यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची सुरुवातीची लक्षण जाणवल्याने मी टेस्ट करून घेतली. त्यात माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. माझी तब्येत चांगली आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने मी होम आयसोलेशनमध्ये असून डॉक्टरांच्या सर्व सूचनांचं पालन करत आहेत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची टेस्ट करून घ्यावी आणि स्वत:ला क्वॉरंटाईन करून घ्यावं, असं नड्डा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील तुमच्या आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्व कार्यक्रम रद्द

दरम्यान, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नड्डा यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांचा मुंबईत 18, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दौरा होता. पण त्यांनी हा दौराही पुढे ढकलला आहे. या दौऱ्यात ते आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार होते. हैदराबादच्या पालिका निवडणुकीत वापरण्यात आलेले प्रचाराचे हातखंडे, उमेदवारांची निवड, स्थानिक पातळीवरील समस्यांवरून उठवलेले रान आणि विभागनिहाय करण्यात आलेली बांधणी आदी गोष्टींचा मुंबई महापालिका निवडणुकीत उपयोग होऊ शकतो का? यावरही ते मुंबईतील नेत्यांशी चर्चा करणार होते.

नड्डा हे ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी हैदराबादेत तळ ठोकून होते. त्यानंतर ते पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरही गेले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर ते दिल्लीत आले होते. असंख्य कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, जनतेशी झालेला थेट संवाद यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं बोललं जात आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.