असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

0 झुंजार झेप न्युज

पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही कान उपटले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचेही कान उपटले आहेत. “महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली.

शरद पवार म्हणाले, “शेतकरी कामगार मोर्चाच्या आयोजकांनी मला सांगितलं की सभेनंतर शेतकऱ्यांच्यावतीने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक निवेदन देण्यात येणार आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला असे राज्यपाल भेटले नाही. मुंबईत लाखोंच्या संख्येने येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. असं असताना राज्यपाल गोव्याला गेले. त्यांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही. त्यामुळे आता हे निवेदन कुठं द्यायचं काय करायचं याचा विचार करावा लागेल.”

राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे त्यांनी याला सामोरं जायला हवं होतं. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण तेही धैर्य त्यांनी दाखवलं नाही. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही,” असंही शरद पवार यांनी राज्यपालांना खडसावलं.

विशेष म्हणजे याधी देखील शरद पवार यांनी राज्यपालांच्या वर्तनावर निशाणा साधला होता. राज्यपालांनी त्यांचं कॉफी टेबल बुक प्रकाशित केलं होतं. त्यावरुन पवारांनी राज्यपालांचे वाईटरीत्या कान टोचले होते.

स्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे? शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

दरम्यान, याआधी शरद पवार यांनी राज्यपालांच्या पुस्तकाच्या शिर्षकावरुनच त्यांना फटकारलं होतं. “वास्तविक भारतीय संविधानात ‘जनराज्यपाल’ असा उल्लेख आढळत नाही, तरीही राज्य शासनाच्यावतीने सुबक छपाई असलेले आपल्या एक वर्षाच्या मर्यादित कालावधीवर प्रकाश टाकणारे स्व प्रसिद्ध कॉफी टेबल बुक पाठवण्यात आले याबद्दल धन्यवाद”, अशा शब्दात पवार यांनी राज्यपालांच्या पत्राला खोचक उत्तर दिलं होतं.

“आपल्या मर्यादित कालावधीतील एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी, स्वागत समारंभ, दीक्षांत समारंभ यांसारखे सोहळे, उच्चपदस्थ अभ्यागतांच्या – मान्यवरांच्या भेटीगाठी, इतर सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रम वर त्यातील आपल्या सहभागाची छायाचित्रे पाहण्यात आली. तसेच निधर्मवादा संदर्भात राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण दिलेल्या सल्ल्याची आणि त्या उपरांत केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतलेल्या दखलेची नोंद या पुस्तकात दिसून आली नाही”, असा टोलाही शरद पवार यांनी पत्राच्या माधम्यातून लगावला होता.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावरही पवार नाराज

‘राज्यपाल हे देशातील महत्वाच्या आणि आदरणीय पदांपैकी एक पद आहे. त्या पदाचा आदर जसा राखला जातो, तसाच मुख्यमंत्री या पदाचाही राखला गेला पाहिजे. आता केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यानंतर राज्यपालांनी पदावर राहावं नाही हे ठरवावं’, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तसंच पवार यांनी राज्यपालांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त करताना थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप व्यक्त केला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.