या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
पुणे : पुण्यात वारंवार गुन्ह्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आताही नात्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुतण्यानेच चुलतीची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून इंदापूर तालुक्यातील काटी गावात दोन कुटुंबात झालेल्या वादातून पुतण्याने सख्ख्या चुलतीवरती रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. याबाबत मयताचा मुलगा सचिन भोसले याने इंदापूर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी तात्काळ दोन आरोपिंना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तिसरा आरोपी हा जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जमिनीच्या वादातून सख्खी नाती एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. नात्यामध्ये पैसा आला की गुन्ह्यांच्या घटना समोर येतात असंही आता म्हणावं लागेल.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चुलतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस आरोपींची कसून चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर हत्येमागचा आणखी उलगडा करण्यासाठी पोलीस कुटुंबाचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

