काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नवी मुंबई : ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला नवी मुंबईत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका तनुजा मढवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती घड्याळ घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर गणेश नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेविका तनुजा मढवी या प्रभाग क्र 83 च्या भाजपा नगरसेविका होत्या. पण अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांआधीही काही नगरसेवकांनी भाजपची साथ सोडली. त्यामुळे नवी मुंबईत भाजप आणि गणेश नाईकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नवी मुंबईतील याआधी पाच आणि आता आणखी एका नगरसेवकानी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे हा भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला धक्का असल्याचं मानलं जात असून त्यामुळे नाईक गोटात खळबळ उडाली आहे. पण नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता असली तरी नाईक यांनी मात्र, जे गेले त्यांना शुभेच्छा, असं म्हणत या बंडखोरांना शुभेच्छा दिल्या होत्या.
भाजपमधील बंडखोरीनंतर गेल्या काही दिवसांआधी गणेश नाईक यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन चोख प्रश्नांची उत्तरं दिली होती. जे पक्ष सोडून गेले त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. नव्या पक्षात दाखल झालेल्यांनी तिथे सुखाने नांदावे. नांदा सौख्य भरे, असं सांगतानाच मला नगरसेवकांनी सोडून जाणं हे नवीन नाही. ही आजची घटना नाही किंवा पहिल्यांदाच असं घडतंय असं नाही. 1995 पासून ही धरसोड सुरूच आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
गणेश नाईक भाजप सोडण्याच्या रंगल्या होत्या चर्चा
दरम्यान, लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये गेलेले नेते आगामी काळात राष्ट्रवादीत येऊ शकतात, असं जयंत पाटील म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या यादीत नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नावाचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या होत्या. पण आता पक्षातील सच्चे समर्थक साथ सोडत असल्याने नवी मुंबईत भाजपला पुन्हा खिंडार पडणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले होते गणेश नाईक ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कपोलकल्पित असल्याचे भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक म्हणाले होते. नाईक यांनी भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केलं होतं. पक्ष प्रवेशाच्या खोट्या बातम्या पेरुन विरोधकांचे मनसुबे पूर्ण होणार नसल्याचा टोलाही गणेश नाईकांनी लगावला होता.

