कोविड प्रसारक मंडळ? नको रे बाबा… मुख्यमंत्र्यांनी मोर्चेकऱ्यांना दिला ‘हा’ सल्ला

0 झुंजार झेप न्युज

राज्यात आज तीन मोठे मोर्चे सुरू आहेत. त्यामुळे हजारोच्या संख्येने लोक जमा झाल्याने त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचंड चिंता व्यक्त केली आहे.

कल्याण: राज्यात आज तीन मोठे मोर्चे सुरू आहेत. त्यामुळे हजारोच्या संख्येने लोक जमा झाल्याने त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रचंड चिंता व्यक्त केली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्याच्याशी आपण लढत आहोत. त्यामुळे कोविडचे प्रसारक होऊ नका, आंदोलने, मोर्चे टाळा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांना दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ऑनलाईनद्वारे कल्याणच्या पत्रीपुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. सर्व पक्षाच्या नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की, मोठमोठे सभा, मोर्चे, आंदोलने टाळले पाहिजेत. कोव्हिड आपण संपवू शकत नसलो, तरी त्याचे प्रसारक बनू नका… कोविड प्रसारक मंडळ…नको रे बाबा…आम्ही नाही त्याचे सदस्य, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

खबरदारी घ्या, जबाबदारी पार पाडा

लोकप्रतिनिधींनीही कोविडबाबत काळजी घेण्याची गरज आहे. अजूनही धोका टळलेला नाही. कोरोनाचे ढग जोपर्यंत जात नाही. तोपर्यंत आकाश मोकळे होणार नाही. राज्य सरकार कोरोनाचं संकट दूर करण्याचा प्रयत्न करत आहेतच. पण तुम्हीही खबरदारी घ्या, जबाबदारी पार पाडा, असं आवाहनही त्यांनी केलं.

पत्रीपुलाला कलाम यांचं नाव द्या

दरम्यान, यावेळी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी पत्रीपुलाला माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं नाव देण्याची मागणी केली. पत्रीपूल हे नाव बोलण्यास कसं तरी वाटते. त्यामुळे नाव बदलून त्याला कलाम यांचं नाव द्या. तसं निवेदनही मी दिलं आहे. दुसऱ्या काही नावांचा प्रस्ताव आला असेल तर त्याच्यावर विचार करा, पण पत्रीपुलाचं नाव बदला, असं पाटील म्हणाले. तर पत्रीपुलाला तिसाई देवी पूल हे नाव देणअयात आलेले आहे. मात्र जनतेचा कौल बघता नवीन नाव देण्यासाठी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याकडे जाऊ, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पुलाच्या नावावरून राजकारण न करण्याचा सल्लाही शिंदे यांनी पाटील यांना यावेळी दिला.

पत्रीपुलाच्या कामाला विलंब झाला. पण तरीही हे काम पूर्ण झालं आहे. आता वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागणार नाही. कल्याणच्या सॅटीस प्रकल्पाचंही आज भूमीपूजन होणार आहे. तसेच कल्याणच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचेही उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून विकास कामासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही शिंदे म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.