मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.
आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी आघाडी सरकारवर टीका केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा तरुणांना दिलासा दिला पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.
मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल त्यांची ताकद संपली असेल असं सरकारला वाटत असावं. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आलेला नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून केवळ मराठा समजाला खेळवा-खेळवीचं राजकारण हे सरकार करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे. सर्व भरत्या सुरू केल्या आहेत. सोंग आणि ढोंग करण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पंकजा मुंडेंबाबत मौन
भाजप नेते पंकजा मुंडे यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यास दरेकर यांनी टाळाटाळ केली. पंकजा मुंडे या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांच्या वक्तव्यावर पक्षच आपली भूमिका स्पष्ट करेल, असं सांगत दरेकर यांनी या मुद्द्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.
झारीतले शुक्राचार्य कोण?
मुख्यमंत्र्यांचे फायलीवरील शेरे बदलले जात असल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचे फायलीवरील शेरे बदलणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे शेरे बदणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल करतानाच सरकारचा प्रशासनावर अंकूशच राहिलेला नाही हे या निमित्ताने दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिंदेंना 100 कोटींचीही किंमत नाही
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरही टीका केली. शशिकांत शिंदे यांना 100 कोटींचीही किंमत नाही. आमच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना तिथे किंमत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मराठा मोर्चाच्या मागण्या
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची 10 जानेवारी आझाद मैदानात राज्यस्तरीय सभा झाली होती. यात महाराष्ट्रातील सर्व प्रमुख समन्वयकांनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर काही महत्त्वाचे ठराव संमत केले होते. विशेष म्हणजे आतापर्यंत ओबीसी आरक्षणातून आरक्षण न घेता स्वतंत्रपणे आरक्षण द्या, अशी भूमिका घेणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाने आता ओबीसी कोट्याला हात घातला आहे. सरकार न्यायालयातील स्थगिती उठवण्यात असमर्थ ठरले, तर मराठा समाजाला ओबीसी समुहात समाविष्ट करुन आरक्षण द्यावे, अशी थेट मागणी करण्यात आली आहे. सरकारी नोकरीमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय आणि नियमावली, विविध शासन निर्णय याचे चुकीचे अर्थ लावण्यात आलेत. त्यामुळे राज्यातून बेरोजगार युवकांनी केलेल्या भरती पूर्व आरक्षण आणि अनुशेष संदर्भात आढावा घेण्याच्या मागणीवर शासनाने विचार करावा, औरंगाबादचे नामांतर करून तत्काळ “छत्रपती संभाजीनगर” असं करावं, सत्ताधारी आणि विरोधक यांनी मराठा आरक्षण राजकारण न करता मराठा आरक्षणातील चुका दुरुस्त करून न्याय द्यावा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या होत्या.

